संभाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध पारायण सोहळा उत्साहात सुरु

सातारा: श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित दासबोध अभ्यास मंडळ, मेघदूत कॉलनी संभाजीनगर येथे शुक्रवारी मारुती मंदिरात श्री दासबोध पारायण सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
या निमित्त संभाजीनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष मगर व ग्रा. पं. सदस्य जयवंत मोरे, बाळुबुवा रामदासी, महादेव बोराटे, खोत सर यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन दासबोध पारायणास प्रारंभ झाला. यावेळी समर्थ विद्यापीठाचे सुरेश काळे, अरविंद काळे, मधुकर मल्लकमीर, दादा वीर व वाचक अभ्यासार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ग्रा. पं. सदस्य जयवंत मोरे म्हणाले, दासबोध अभ्यास मंडळाने राबविलेला उपक्रम अत्यंत चांगला असून दासबोध पारायणामुळे लोकांच्या मनात धार्मिक इच्छा शक्तीला चालना मिळत असते. 22 ते 28 मार्च दरम्यान सुरु राहणार्‍या या पारायणाचा लाभ संभाजीनगर मधील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांचा श्रीफळ, गुलाबपुष्प देवून श्री दासबोध अभ्यास मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव बोराटे यांनी केले. तर स्वागत खोत सर यांनी केले. या पारायण सोहळ्यात 60 ते 70 वाचक सहभागी झाल्याचे संयोजकातर्फे सांगण्यात आले.