माण मतदार संघात सरासरी 64 टक्के मतदान इव्हीएम मशिन संथगतीने चालल्याने रात्री उशिरापर्यंत रांगा

वडूज: खटाव तालुक्यात आज सरासरी 64 टक्के शांततेत मतदान झाले. मतदानाच्या इव्हीएम मशिन संथ गतीने काम करण्यामुळे मतदारांना मतदानासाठी बराच वेळ केंद्राबाहेर ताटकळत थांबावे लागत होते.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत माण मतदार संघात सुमारे 58.48 टक्के मतदान झाले होते. यामध्ये 99 हजार 547 पुरूषांनी तर 99 हजार 423 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संथ गतीच्या इव्हीएम मशिनमुळे वेळेत मतदान प्रक्रिया पार पडत नव्हती त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यानंतर सुद्धा कातरखटाव येथे सुमारे 250 व खातवळ येथे सुमारे 100 मतदारांची रांग होती. तर बनपूरी येथे दोन मतदान केंद्राऐवजी एकच मतदान केंद्र केल्यामुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत 150 हून अधिक मतदार रांगेत होते.
अशीच परिस्थिती वडूज शहरातील काही मतदान केंद्रांवर व अन्य ठिकाणी होती. रविवारी रात्री औंध परिसरात शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांच्या गाडीवरील अज्ञातांचा हल्ला वगळता सोमवारी दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी मताधिक्यासाठी तीन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस जाणवत होती. कार्यकर्त्यांनी मतदान वटविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काळजीपूर्वक प्रयत्न केले.