23 तारखेनंतर विरोधकांची हालत खराब होईल: खा.श्री.छ. उदयनराजे भोसले

वाठार किरोली: विरोधकांनी भान ठेवूक वक्तव्य करावे. वैयक्तिक टिका – टिप्पणीपेक्षा विकासकामांबाबत बोलावे. 23 तारखेनंतर वस्तुस्थिती लक्षात येताच तुमची हालत खराब होईल, असा गर्भित इशारा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज वाठार किरोली ता. कोरेगाव येथील सभेत बोलताना विरोधकांना दिला.
वाठार किरोली व पुसेसावळी ता. खटाव येथील प्रचारसभेत श्री. छ. उदयनराजे भोसले बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, बाळासाहेब सोळस्कर, सुनील माने, देवराज पाटील, चंद्रकांत जाधव, मानसिंगराव जगदाळे, अजित पाटील चिखलीकर, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, संभाजीराव गायकवाड, सी. एम. पाटील, वडुजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.


उदयनराजे म्हणाले, मी कधीही वैयक्तिक टिका केली नाही. परंतू ज्यांच्याकडे मुद्देच नाहीत ते पातळी सोडून वैयक्तिक स्तरावरील भाषा बोलत आहेत. लोकशाहीत काही मुल्ये आहेत, आपण ती कायमच पाळत आलो आहोत. तसेच मी नेहमीच मनुष्य हाच धर्म आणि माणूस हीच एकमेव जात मनात आलो आहे. आजपर्यंत सर्वसामान्य जनतेचा सत्ताधार्‍यांनी केवळ वापरचं करून घेतला. वाईट याचेच वाटते कि, स्वतःचा वापर करू नये म्हणून जनतेने योग्य ती दक्षता घेतली नाही. मी मनकी बात, नव्हे तर लोकहिताची बात करणारा माणूस आहे. सत्ताधारी सरकार ही जनतेला विकासापासून वंचित ठेवणारी हुकूमशाही आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी यातुन बोध घ्यावा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व्याप्ती ऍड. प्रकाश आंबेडकरांकडे येऊ द्यावी. संकुचित विचार न करता विचारांचा कॅनव्हास त्यांनी मोठा करायला हवा.
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की, नोटबंदी, जीएसटीमुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. राज्यातील युती सरकार गेली साडेचार वर्षे आपापसात भांडत होते, त्याचा परिणामही कारभारावर आणि प्रशासनावर झाला. आजवर जी कामे झाली ती केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली आहेत. तसेच लोकशाही जिवंत ठेवण्याचे कामही काँग्रेस आघाडीनेच केले आहे. विकासाची परंपरा पुढे अखंडित ठेवण्यासाठी सातार्‍यातून उदयनराजेंनाच निवडून देणे गरजेचे आहे.शरद पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी श्री. छ. उदयनराजे यांना तिस-यांदा लोकसभेत आपले प्रतिनिधी म्हणून पाठवावे, असे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
अजितराव पाटील- चिखलीकर म्हणाले, विरोधी उमेदवाराला जिल्ह्याची माहिती नाही. नरेंद्र पाटील यांना माझं आव्हान आहे की, त्यांनी कोंबडवाडी गाव कुठे आहे ते दाखवावे. तुमच्या आमदारकीच्या काळात झालेली कामे दाखवावीत.
देवराज पाटील म्हणाले, मोदी सरकारने अनेक चुकिची धोरणे राबवली. अशा या मोदी सरकारला मताच्या रुपाने जागा दाखवायची आहे. मतपत्रिकेत उदयनराजे यांचे नाव दोन नंबरला आहे. त्यापुढील बटन दाबून राष्ट्रवादी व काँग्रेस मित्रपक्षांचे उमेदवार उदयनराजे यांना निवडून द्यावे.
यावेळी बाळासाहेब सोळसकर, पोपटराव गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सभेमध्ये विक्रमराव जाधव, लहू जाधव यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
या प्रचार सभांना खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, बबनराव कदम, अ‍ॅड. अशोकराव पवार, खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब लादे, सागर पाटील, जितेंद्र भोसले, भास्करराव गोरे, राजाभाऊ जगदाळे, शहाजीराव क्षीरसागर, सुरेश उबाळे, शाहूराज फाळके, युवराज जाधव, विठ्ठलराव घोरपडे, संजय कुंभार, रेखाताई घार्गे, जयश्री कदम, सुरेश पाटील, संतोष घार्गे, समरजितराजे भोसले, धनाजी पावशे, अनिल माने, महेश पाटील, बापू थोरवे, निवास पवार, मितेश खाडे तसेच पंचक्रोशीतले ग्रामस्थ उपस्थीत होते.