खटाव तालुक्यात पानी फाऊंडेशनचे चित्र प्रदर्शन

वडूज: वॉटर कप स्पर्धेद्वारे राज्यात जलसंधारण आणि मृदुसंधारण कामांचे तुफान आणणार्‍या पानी फाऊंडेशनच्या वतीने खटाव तालुक्यात 28 आणि 29 डिसेंबर रोजी चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी दिली . 2016 पासून महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये लोकसहभागाचे रान उठवून दुष्काळ हटविण्याचे काम हाती घेतलेल्या पानी फाऊंडेशनने या वर्षी वॉटर कप स्पर्धा आणि व्यापक स्वरुपात आयोजित केली आहे. राज्यातील 75 तालुके स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्यात बिकट झालेला पाणीप्रश्न सोडविण्याची क्षमता आपल्या लोकांमध्येच आहे. लोकांमधील शक्ती जागृत करुन त्यांना जलसंधारणाचे तांत्रिक ज्ञान देऊन प्रशिक्षित करण्यासाठी पानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी खटाव तालुक्यातील अनेक गावांनी स्पर्धेच्या माध्यमातून मृदु व जलसंधारणाची कामे करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे चांगले प्रयत्न केले.
गावागावात लोकसहभागातून श्रमदान, प्रशासन, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नातून गावे पाणीदार होण्यास मदत झाली. पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेऊन दुष्काळाशी दोन करण्याची क्षमता निर्माण करणार्‍या गावांचे अनुभव सांगणार्‍या चित्रप्रदर्शनाचे आयोजन खटाव तालुक्यातील वडूज येथे आयोजित करण्यात आले आहे.
28 आणि 29 डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात भरणार्‍या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी असे अवाहन तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे यांनी केले आहे.