पुसेसावळी येथे दरोडा; 80 हजार व दीड तोळे सोने लंपास

पुसेसावळी : येथील नवीन एस.टी स्टॅण्ड समोरील गिरिजाशंकर खानावळीच्या पाठीमागे राहत असलेल्या माने कुटूंबीयाच्या घरावर सुमारे पाच दरोडेखोरांनी सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील 80 हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचे दागीने लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे सुमारे सव्वाचार वाजणेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी शारदा माने यांनी पुसेसावळी पोलीसांत तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी माने व त्यांच्या पत्नी शारदा असे दोघेजण दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाले आहेत. या घटनेने पुसेसावळी परिसरात खळबळ उडाली आहे.पुसेसावळी पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने यांची गिरिजाशंकर खानावळ आहे.पत्नी शारदा यांच्या समवेत ते खानावळ व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून झोपले होते.शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दरवाजाला जोराचा धक्का मारुन पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला व माने पती-पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करत,चाकुचा धाक दाखवुन दरोडेखोरांनी कपाटातील ऐंशी हजार रुपये,सोन्याची कर्णफुले,गरसोळी व सोन्याची अंगठी असा एकूण सव्वा लाख रुपयांवर डल्ला मारला.
दरोडखोरांनी केलेल्या मारहाणी मध्ये शिवाजी माने व शारदा माने हे दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेने पुसेसावळी परिसरात एकच दहशत निर्माण झाली असुन दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून दरोडेखोरांचे ठसे घेतले आहेत.श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते,पोलीस उपअधीक्षक धिरज पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कुंभार आदींनी भेट देऊन पाहणी केली.दरोडेखोर सुमारे 20 ते 25 वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.तसेच,रणजित रामचंद्र सोनावणे यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.तपासकामी पोलीस यंत्रणा दिवसभर पुसेसावळीत सज्ज होती.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत.