चितळीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडली

* गॅस कटरने तिजोरी उचकटली * चोरट्यांची पाऊण कोटीची दिवाळी *
मायणी : चितळी ता. खटाव गावच्या हद्दीत मारूती मंदिरजवळ असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चितळी शाखेचे मेन गेटचे कुलूप चोरट्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कापून तसेच बँकेच्या पाठीमागील खिडकीचे गज गॅसकटरने कापून आत प्रवेश केला. तिजोरीत ठेवलेले सोन्या-चांदीचे ऐवज 1975. 50 ग्रॅम व रोकड असा सुमारे 74 लाख 38 हजार 636 रूपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटनेमुळे चितळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे या चोरीचा तपास वडुज पोलीस करीत आहेत.
img-20161021-wa0039

 

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मायणी ता. खटाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून शाखा व्यवस्थापक म्हणून अविनाश विष्णू कदम रा. येरळवाडी दि. 25 ऑगस्ट 2016 पासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा व दोन मुलीसह ते रहायला होते. मायणी शाखेत शिकाऊ शाखा व्यवस्थापक म्हणून ते काम करीत होते. याबरोबरच कॅशिअर, व्ही. पी.निकाळजे, शिपाई मोहन तुकाराम कुंभार, व विकास अधिकारी म्हणून सुभाष जालिंदर बागल रा. कातर खटाव असे कर्मचारी बँक  शाखेत काम करीत होते. बागल हे आठवड्यातून दोन दिवस कामानिमित्त असतात. शाखेमध्ये सोने गहाण व्यवहार कर्ज प्रकरणी संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी आधी पेन्शन योजना, शेती कर्ज, पीक कर्ज, असे व्यवहार दैनंदिन बँकेत चालत असतात. शिकाऊ शाखा व्यवस्थापक भाग्यवंत पवार यांनी मायणी दुरक्षेत्रामध्ये दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, आपण उंबरडे ता. खटाव येवून जाऊन येऊन नोकरी करीत होतो. कॅशिअर निकाळजे निमसोड येथून जाऊन येऊन काम करीत असतात. शिपाई कुंभार हा मायणी येथून जाऊन येवून नोकरीत करीत असतो. सकाळी 9.45 ते सायंकाळी. 5. वा. पर्यंत बँकेची कामकाजाची वेळ आहे. आमचे शाखेत स्ट्राँगरूमची सोय असून त्यात सोने व रोकड ठेवली जात असते. त्याच्या चाव्या भाग्यवंत पवार व कॅशिअय निकाळजे यांच्याकडे असतात. सायंकाळी बँक बंद केल्यानंतर मेन चावी शिपाई कुंभार यांच्याकडे असते. याशिवाय बँकेच्या मेन दरवाजाला सायरनची सोय आहे. शाखेमध्ये सीसीटीव्ही. कॅमेरे बसवलेले  आहेत. स्ट्राँगरूमला सायरनची सोय केलेली आहे. काल गुरूवार दि. 20 रोजी नेहमीप्रमाणे कॅशिअर सकाळी 9.45 च्या सुमारास चितळी ता. खटाव येथे आले असता. शिपाई कुंभार हाही आला होता. त्यावेळी बँकेची झाडालोट करून कामकाजाला सुरूवात केली. चितळी येथील सुर्यवंशी यांचा सोने तारण एक व्यवहार केला. यशिवाय शाखेमध्ये दैनंदिन व्यवहार चालू होते. दुपारी 3.30 च्या सुमारास कॅश व्यवहार बंद केला. त्यानंतर सोने गहाण व्यवहार 4.10 वा. बंद केला. व तिजोरी बंद केली त्याच्या चाव्या पवार यांच्याकडे एक व कॅशिअर यांच्याकडे एक अशा ठेवल्या. दि. 21 रोजी एक दिवसांची रजा मंजूर करून घेतलेले पवार यांच्याकडील चावीचा चार्ज कॅशिअर यांच्याकडे दिला. सायं. 5 वा. नेहमीप्रमाणे शाखा बंद करून निकाळजे घरी गेला. निघण्यापूर्वी शाखेतील अ‍ॅलार्म व्यवस्था चालू असल्याची खात्री केली. शुक्रवारी पवार एक दिवसाच्या रजेवर होते. सकाळी 9.20 च्या सुमारास शिपाई कुंभार यांनी त्याच्या मोबाईलवरून फोन केला आपली शाखा फोडली आहे अशी माहिती दिली. याबरोबरच तात्काळ तालुका विभागीय विकास अधिकारी एस.व्ही. शिंदे यांना फोन करून कल्पना दिली. सकाळी 10.30 च्या सुमारास कॅशिअर निकाळजे व डी.डी. ओ शिंदे हे शाखेसमोर उपस्थित होते. शाखेच्या मुख्य दरवाजाची कुलूपे कापलेली दिसली. शाखेच्या पाठीमागील भिंतीत असलेली खिडकीचे लोखंजी गज गॅस कटरच्या सहाय्याने कापलेली दिसली. तसेच खिडकीची जाळी उचकटलेली दिसत होती. शाखेत आत जाऊन पाहिले त्यावेळी चोरट्यांनी सायरनचा भोंगा फोडलेला दिसला. स्ट्राँगरूमची पहाणी केली असता कुलूप कापलेले दिसले. तिजोरी गॅसकटरच्या सहाय्याने चोरट्यांनी कापून 20 लाख 95 हजार 226 रूपयाची रोकड तसेच 1975.50 ग्रम वजनाचे सोन्याचे 84 डाग  सुमारे 52 लाख 43 हजार 400 रू. तसेच सी.सी. टीव्ही. कॅमेराची सिसको रायटर मशिन एमआयटेक मोडेम डिलींगचा स्विच तसेच एलव्हीआर कॅमेरा सुमारे 1 लाख असा एकुण 74 लाख 38 हजार रूपयाचा ऐवज ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी लांबवल्याने बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यासह सभासद वर्ग धास्तावले आहेत. तर या चोरीच्या तपासासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी चक्रावलेले आहेत.  या चोरीप्रकरणी मायणी दुरक्षेत्रामध्ये आज गुन्हा दाखल झाला असून या चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ञांना बोलावून भिंतीवरील ठसेही घेण्यात आले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर एवढी मोठी चोरी झाल्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक  धास्तावले आहेत.