समाजातील अडचणी सोडविणे हे कर्तव्याबरोबर आपला धर्म आहे : सहायक पोलीस अधिक्षक समीर शेख

सातारा : समाजाविषयी संवेदनशीलता दाखवून समाजात काय अडचणी आहेत याचा विचार करुन त्या अडचणी सोडविण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. समाजातील अडचणी सोडविणे हे कर्तव्याबरोबर आपला धर्म आहे, असे प्रतिपादन सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात जिल्हा युवा मंडळ, युवा गौरव, सातारा भुषण पुरस्कार व क्रीडा साहित्याचे वितरण आज करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुण्याचे सीआरपीएफचे सचिन गायकवाड, माने ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रामदास माने, जिल्हा माहिती अधिकारी यवुराज पाटील, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुधीर इंगळे, कृषी विद्यापीठाचे डॉ. शरद गलांडे, एम.एस.डब्ल्यू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाली जोसेफ, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंतराव मानखेडकर आदी उपस्थित होते.
तरुणांनी समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे सांगून श्री. शेख पुढे म्हणाले, तरुणांना समाजातील अडचणींची जाणीव असली पाहिजे. मनात कोणतीही भिती न बागळता एखाद्या लिडर प्रमाणे समाजाच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. सतत सकारात्मक विचार करा. दुसर्‍यांना सुखी करायचे असेल तर स्वत: प्रसन्न रहा. तरुणांनी समाजोपयोगी कामे मोठ्या प्रमाणात करा, असे आवानही त्यांनी शेवटी केले.
आपला देश आज घडीला जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जगातली सर्वाधिक तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. 2021 पर्यंत ही युवकांची संख्या स्थीर असणार आहे. म्हणून केंद्र व राज्य शासनाने तरुणांच्या कौशल्य विकासावर भर दिला आहे. अधिकाधिक युवक कौशल्याभिमुख व्हावेत , सध्याच्या युगात सेवा उद्योग महत्वाचा ठरत आहे. त्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकासही महत्वाचा आहे. हे जाणून युवकांनी स्वतःतले कौशल्य ओळखून त्याचा विकास तरुणांनी केला पाहिजे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी केले.
मराठी तरुणांनी उद्योजक निर्मिती क्षेत्रात आले पाहिजे. कोणतीही गोष्ट अवघड नाही फक्त तरुणांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे, असे माने ग्रुप ऑफ कंपनीचे रामदास माने यांनी यावेळी सांगितले.
देशात 4 लाख संस्था नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 40 हजार तर सातारा जिल्ह्यात 1 हजार 200 संस्था नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करीत असल्याचे यशवंतराव मानखेडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी मुले-मुली मोठ्या संख्यंने उपस्थित होते.