सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास राजेशिर्के यांची बिनविरोध निवड

सातारा : सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर गुरूवारी सुहास राजेशिर्के यांची पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जाहिर केले.
दरम्यान उपनगराध्यक्ष निवडीवेळी विरोधी नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी पाठ फिरवली होती. भाजपच्याही तीन नगरसेवकांनी निडीला दांडी मारली होती. विरोधी नगरसेवकांची अनुपस्थिती हा पालिका वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला. यावेळी नियुक्तीनंतर सुहास राजेशिर्के  म्हणाले, सातारा शहर वायफायफ युक्त करणार असा विश्‍वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सातारा पालिकेवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पहिल्यावर्षी खा. उदयनराजेंनी राजू भोसले यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली होती. भोसले यांना सव्वा वर्षे संधी दिल्यानंतर नेत्यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या आठवड्यात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे सर्पुद केला होता.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी गुरूवार दि. 25 रोजी निवडीचा कार्यक्रम जाहिर केला होता. पदावर काम करण्याची सर्वांना संधी दिली जाईल असे आश्‍वासन खा. उदयनराजे भोसले यांनी सर्व नगरसेवकांना दिले आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाचे नाव जाहिर केल्यानंतर त्या पदासाठी रस्सीखेस नव्हती. आज गुरूवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने राजे शिर्के यांची बिनविरोध निवड झाल्याचे सौ. कदम यांनी जाहिर केले.
या निवडीनंतर राजे शिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खा. उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले आणि दयमयंतीराजे भोसले यांनी मला या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिळालेल्या संधीचा मी शहराला दर्जेदार मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी करणार आहे.
वर्षभरात खा. उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेवून शहरातील रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छता आणि पथदिवे या मुलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भुयारी गटार, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर, सयाजीराव हायस्कूलसमोर पादचारी पूल आदी कामे मार्गी लावली जातील. लवकरच जकातवाडी येथे 5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत होइल. त्यामूळे शहराला जादा पाणी पुरवठा उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. संपुर्ण सातारा शहर वायफाय युक्त करणार असल्याचा मानस श्री. शिर्के यांनी व्यक्त केला. या निवडी प्रसंगी मावळते उपाध्यक्ष राजू भोसले, साविआचे पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृहनेत्या स्मिता घोडके, अ‍ॅड. दत्ता बनकर, नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी शंकर गोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान उपनगराध्यक्ष निवडीसाठी सकाळी 11 वाजता बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा ही नगरसेवकांच्या उशिरा येण्यामुळे तब्बल एका तासानी सुरू झाली. निवडीच्या बोलाविण्यात आलेल्या सभेला सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविक उपस्थित होते. मात्र विरोधी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचा एकही नगरसेवकांसह भाजपाच्या तीन नगरसेवकांनी निवडीकडे पाठ फिरविल्याने पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.