गावकर्‍यांनो शासनाच्या योजना समजून घ्या, प्रभावी अंमलबजावणीसाठी लक्ष ठेवा

????????????????????????????????????

सातारा : गावामध्ये शासनाच्या विविध योजना शंभर टक्के राबविल्या तर इतर निधीची आवश्यकता भासणार नाही व गावाचा मोठा विकास होईल हा माझा अनुभव असून गावकर्‍यांनो शासनाच्या योजना समजून घ्या त्याची अधिकार्‍यांकडून प्रभावी अंमलबजावणीसाठी लक्ष ठेवा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आज सायगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुद्रा कर्ज योजना, पीक कर्ज, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेचे धनादेशाचे यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, अंचल प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, सायगावचे सरपंच अजित आपटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे नितीराज साबळे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा सन्मवय मयुर घोरपडे आदी उपस्थित होते.
गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या एकातरी योजनेचा लाभासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेशन योजना या योजनांची माहिती तर प्रत्येक नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला आहे, अशा नागरिकांनी शासनाच्या योजनांची माहिती इतरांना सांगावी व योजनेचा लाभ घेण्याविषयी प्रवृत्त करावे. तसेच शासनाने जन आरोग्य योजना सुरु केली असून 5 लाखापर्यंतचा लाभ मिळू शकतो. या योजनेचाही सायगाव येथील नागरिकांनी लाभ घ्यावा.
आजच्या शेतकरी मेळाव्यात विविध उद्योग उभारणीसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्जाची परतफेड वेळेत करा आणि आपली प्रगती साधा, असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या आज बचत गटांनाही कर्जाचे धनादेश देण्यात आले आहे. बचत गटांनी छोटे-छोटे उद्योग सुरु करावे. यात मन लावून काम करा आपली प्रगती साधा. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. स्वत:चे आर्थिक् स्त्रोत तयार करा समाजात तुम्हाला आदराचे स्थान मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी सांगितले. शेतकरी मेळाव्यास सायगाव येथील शेतकरी, बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.