विधानपरिषदेसाठी एस.एम.देशमुख यांची मागणी योग्य :- खा. श्रीनिवास पाटील.

पाटण :- पत्रकारांचा प्रतिनिधी विधीमंडळाच्या सभागृहात हवा हि आपली योग्य मागणी आहे. एस.एम. देशमुख यांचे राज्यातील पत्रकारांसाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी “पत्रकार संरक्षण कायदा” लागू झाला. पत्रकारांना कायद्याने संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. याप्रमाणे पत्रकारांना पेन्शन योजना देखील लागू करण्यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासपूर्ण व शांततेच्या मार्गाने झालेल्या आंदोलनाचे यश आहे. पत्रकारांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाची विधानपरिषदेवर निवड होण्याची आपली मागणी योग्य आहे. असे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची विधानपरिषदेवर राज्यपाल कोठ्यातून निवड व्हावी या मागणीसाठी पाटण तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य यांनी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी निवेदन देण्यासाठी भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खा. पाटील पुढे म्हणाले आजपर्यंत राज्याच्या विधीमंडळात व देशाच्या संसदेत अनेक अभ्यासू पत्रकारांना संधी मिळाली. पण सर्वसामान्य पत्रकारांच्या हक्कासाठी कुणीही आवाज उठवला नाही. हि.वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या हक्कासाठी नेहमीच लढणारा पत्रकार मात्र अनेक संकटाना सामोरे जाताना दिसत आहे. ग्रामीण पत्रकारांची अवस्था तर याहीपेक्षा बिकट आहे. एस.एम. देशमुख व किरण नाईक यांची सर्वसामान्य पत्रकारांसाठी असणारी तळमळ मला चांगली ठाऊक आहे. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आदी लढ्याबरोबर त्यांनी सामाजिक हिताच्या कामानाही प्राधान्य दिले आहे. असे पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व विधिमंडळात जावे हि पत्रकारांची मागणी योग्य आहे. असे खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने खा. श्रीनिवास पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनावर पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव माने, उपाध्यक्ष योगेश हिरवे, पी.के.कांबळे, सचिव सौ.विद्या म्हासुर्णेकर – नारकर, माजी अध्यक्ष शंकरराव मोहिते, विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, संजय कांबळे आदी पत्रकार सदस्यांच्या सह्या आहेत. चौकट- २४ जून २०१८ रोजी पाटण येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय तालुका अध्यक्षांचा झालेला मेळावा हा विस्मरणीय ठरला. एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून पत्रकारांची एकवटलेली ताकद मी या मेळाव्यात प्रथम पाहिली. सिक्कीम चा राज्यपाल असताना माझ्या मायभूमीत पत्रकारांनी माझा केलेला गौरव कायम स्मरणात राहील. असे खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितले असता आज बरोबर या मेळाव्याला दोन वर्ष पुर्ण होत असल्याची आठवण पत्रकारांनी त्यांना करून दिली.