सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातार्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उदयनराजेंना पोलीस अटक करु शकतात. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसर्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात.
कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. त्यामुळे 18 फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले.
उदयनराजे आणि त्यांच्या सहकार्यांनी राजकुमार जैन यांना तिथे मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.