सातारा : लेखनासाठी आत्मविष्कार महत्वाचा आहे. माणूस हा सामाजिक प्राणी असला तरी सध्या काळ तर मोठा जास्त कठीण आला आहे. मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्ग वंचितांपासून दूर जाऊन आत्मकेंद्रीत होत आहे. इंग्रजांचे राज्य असताना लिहिण्यावर, बोलण्यावर मर्यादा होत्या परंतु आता स्वातंत्र्य आहे. लेखकांनी व्यापारी, उद्योजकांप्रमाणे रंजनासाठी लिखाण न करता बौध्दिक भांडवलदार न होता समाजातील नाही रे वर्गाच्या समस्या मांडल्या पाहिजेत. सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले पाहिजे. प्रसंगी राजकीय भाष्यही सडेतोडपणे केले पाहिजे, असे आवाहन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातारकरांच्यावतीने शाखेतर्फे त्यांचा ज्येष्ठ साहित्यिक विश्वास दांडेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, मसाप पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पालिकेचे बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. देशमुख यांनी लेखन कशात दडलेले असते हे सांगत त्यांनी सामाजिक दायित्व जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. तळागाळातील समस्या मांडणे, व्यवस्थेचे बळी ठरलेल्यांचे दुःख मांडणे, अत्याचाराविरोधात आवाज उठवणे हे लेखकाचे आद्य कर्तव्य आहे. लेखकाने दुःख कशामुळे झाले, ते कसे दुरु करता येईल त्यावर भाष्य करुन त्याला धीर द्यावा, व्यवस्था कशी सुधारेल, परिस्थिती कशी बदलले यावर राजकीय भाष्य करावे. क्रांती करणारे लिखाण व्हावे यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे. लेखक, कलावंताला संवेदनशीलता आवश्यक आहे. त्याने शोषितांच्या बाजूने, समाजातील नाही रे वर्गाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आहे रे वर्गाच्या अन्यायाविरुध्द आवाज उठवला पाहिजे. यावेळी त्यांनी हिंदीतील कवी, लेखकांचे उदाहरण देऊन कशाप्रकारे लिखाण झाले पाहिजे हे सांगितले. लेखक हा राजकीय भाष्यकार असतो त्याने ते केले पाहिजे. बौध्दिक भांडवलदार होऊन रंजनासाठी लिखाण न करता समता, न्याय, भेदाभेद टाळणारे लिखाण केले पाहिजे. सध्या काळ तर मोठा जास्त कठीण आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. शेतक-यांची परिस्थिती धोकादायक झाली आहे. एकीकडे कृषी संस्कृतीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे वाढत्या शेतक-यांच्या आत्महत्या असे चित्र आहे. गेल्या दहा वर्षात 1 कोटी शेतकरी शेतातून बाहेर पडला आहे. समस्यांची गुंतावळ मोठी असून कितीही लिहिले तरी कमी पडले. लेखक जग बदलू शकत नाही परंतु अनिष्ट काय हे सांगण्याचा प्रयत्न करु शकतो. मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्ग आत्मकेंद्रीत होत असून त्याची समाजापासून नाळ तुटत आहे. अशावेळी साहित्यिकांनी तळागाळातील समस्या, अन्याय, दुःख, लिखाणाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडले पाहिजे. हे लिहिलेले त्यांनी वाचले तरच त्यांना या वर्गाचे दुःख कळू शकेल. मानवाने विवेकनिष्ठ, विज्ञानवादी असायला हवे. मानवताइझम सर्वात श्रेष्ठ असून इतर सर्व इझम त्यापुढे दुय्यम आहेत. सध्या समतेचा काळ असून पुरुषाने स्त्रीला बरोबरने घेतली पाहिजे नाही तर ती तुम्हाला डावलून पुढे जाईल. स्त्री, दलित, मुले, अल्पसंख्यांकावरील अत्याचार वाढत आहेत. त्याविरोधात लेखकांनी बोलले, लिहिले पाहिजे. डॉ. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या वेदनादायी आहेत. त्यांच्या मारेक-यांना, सूत्रधारांना शिक्षा झालीचे पाहिजे विचारांची हत्या होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
मराठी भाषा टिकवण्याची गरज आहे. तंत्रज्ञान बदलत असून मराठीबद्दलचा न्यूनगंड सोडून आणि इंग्रजी म्हणजे सर्वकाही हा भ्रम काढून टाकण्याची गरज आहे. शासनाने धोरणे आणि पालकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. भविष्यात गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून एका भाषेचे तुम्ही दहा भाषेत भाषांतर करु शकणार आहात परंतु त्यासाठी त्या पिढीला मराठी यायला पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषा टिकवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मसापच्या शाखा राबवत असलेले उपक्रम फायदेशीर आणि स्तुत्य आहेत. सामाजिक माध्यमांवर मराठीत लिहण्याचे आवाहन त्यांनी केले. संमेलनाध्यक्षाच्या काळात ठोस कार्यक्रम राबवणार असून त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक विश्वास दांडेकर यांनी बडोदा येथील सयाजीराजे गायकवाडच्या कारकीर्दीकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाले परंतु तिथे संमेलन होत असल्याने हे दुर्लक्ष भरुन निघले अशी अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी सयाजीराजे गायकवाडांनी केलेली कामे सांगितले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करत काही उदाहरणे दिली. प्रश्नापेक्षा व्यक्तीकेंद्रीत होणारा दृष्टीकोन धोक्याचा आहे. या परिस्थितीवर मात करायची असेल तर महात्मा गांधीचे विचारच उपयोग पडणार आहेत. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लिखाणाची वैशिष्टये सांगत गेल्या 80 ते 90 वर्षाच्या कालखंडात बृहनकोषाचे काम दुर्लक्षित झालेले आहे. संमेलनाध्यक्षांनी त्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सातारी कंदी पेढे आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पालिकेचे आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, उदयोन्मुख किक्रेटपटू राज बेबले, ओंकार कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, मसाप पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाखेच्या उपक्रमांची माहिती देणा-याबरोबरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरु केली असून मसाप शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न कॅबिनेट नोट तयार करण्यापर्यंत गेला आहे. मराठीला अभिजातचा दर्जा मिळणे का गरजेचे आहे हे सांगत आता त्याबाबत त्वरित निर्णय होण्यासाठी 26 जानेवारीला पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी नामवंत साहित्यिक, समाजसेवकांसमवेत पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला संमेलनाध्यक्षांनी पाठिंबा द्यावा तसेच शक्य झाल्यास आंदोलनात सहभागी व्हावे अशी मागणी करत त्यांना पत्रही दिले. या प्रश्नासाठी इतरांनीही कृतीशील भूमिका पाठिंबा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी संमेलनाध्यक्ष देशमुख यांचा मसापच्या इतर शाखांच्यावतीने आणि मान्यवरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी करुन आभार मानले. यावेळी प्राचार्य रमणलाल शहा, डॉ. संदीप श्रोत्री, वि.दा.लांडगे, ॠषीकेश सारडा, राजू गोडसे, डॉ. उमेश करंबळेकर, अॅड. चंद्रकांत बेबले, सुभाष सरदेशमुख, संजय माने, सचिन सावंत, मसाप शाहुपुरी शाखा, सातारा शाखा, एम.आय.डी.सी. शाखेचे पदाधिकारी, सदस्य, दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीचे कर्मचारी, साहित्यप्रेमी सातारकर उपस्थित होते.
लेखकांनी बौध्दिक भांडवलदार न होता व्यवस्थेवर भाष्य करणे आवश्यक : देशमुख
RELATED ARTICLES