वडूज(धनंचय क्षीरसागर) : माढा मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे संजयमामा शिंदे व भाजपा – शिवसेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे. शिंदे मामांच्या पोस्टरवर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, रिपाई, कवाडे गट तर युतीचे उमेदवार निंबाळकर यांच्या बॅनरवर भाजपा, शिवसेना, रा.स.प., रयत क्रांती शेतकरी संघटना या मित्र पक्षांचे नामोल्लेख व नेत्यांचे फोटो झळकत आहेत. मात्र प्रत्यक्षात मित्र पक्षाचे तालुकापातळीवरील प्रमुख कार्यकर्ते अद्याप सक्रीय नसल्याचे चित्र माढा मतदारसंघातील खटाव-माण तालुक्यात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी धर्माप्रमाणे माणचे आमदार जयकुमार गोरे संजयमामांचा जाहीर प्रचार करतील अशी अटकळ गेल्या आठवड्यापर्यंत होती. आ. गोरे वरकर्णी आघाडीच्या व्यासपीठावर राहून कार्यकत्यांना खुणवतील अशी शक्यता होती. मात्र या सर्वांना फाटा देत त्यांनी बोराटवाडी येथे कार्यकत्यांचा व्यापक मेळावा घेवून कार्यकत्यांच्या मुखातून भाजपाच्या नाईक-निंबाळकर यांचा प्रचार करावा असे वेद वदवून घेतले आहेत. या सभेस नाईक-निंबाळकर यांच्यासह मोहिते-पाटीलही उपस्थित राहिल्याने जयाभाऊंनी आघाडी धर्म सोडून भाजपाच्या उमेदवारास मित्रत्वाचा हात दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर.पी.आय.च्या दोन्ही गटाचा नामोल्लेख वेगवेगळ्या उमेदवारांच्या बॅनरवर आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फलटण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेस हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पत्रक काढून युतीचे काम करण्याचे फर्मान सोडले आहे. मात्र उमेदवाराकडून अद्याप पाचारण न झाल्याने खटाव तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप व सहकार्यांनी अद्याप घर सोडले नाही. शिवसेनेच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविलेल्या रणजितसिंह देशमुखांनी निमसोड येथे कार्यकत्यांचा मेळावा घेवून युतीचे उमेदवार नाईक-निंबाळकरांना आपला जाहीर पाठींबा दिला आहे. हा मेळावा तसेच फलटण येथील सभेस माजी आमदार बाबुराव माने, जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा जाधव, माजी नगरसेवक गणेश रसाळ यांनी हजेरी लावून औपचारिकता पूर्ण केली आहे. मात्र जिल्हा उपप्रमुख संजय भोसले यांनी दहिवडी येथील सभेकडे पाठ फिरवली होती. तर खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील न्यायालयीन कामकाजात अडकल्याने संपूर्ण प्रचाराची भिस्त देशमुख गटावर अवलंबून राहिली आहे.
मागच्या निवडणूकीत तत्कालीन महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्यावतीने संजय भगत, तानाजी देशमुख, अनिल पवार व इतर शिलेदारांनी प्रस्थापितांविरुध्द चांगली खिंड लढविली होती. मोदी लाटेत सदाभाऊंना जनतेनेही भरभरुन मतदान केले. याचा फायदा घेत भगतांनी कोरेगांव मतदारसंघात युतीची उमेदवारी घेवून आपले आपले विधानसभा लढविण्याच्या स्वप्नांचे घोडे गंगेत न्हावून घेतले. कालांतराने शेतकरी संघटनेत फुट पडली. श्री. पवार, देशमुख खा. राजू शेट्टी यांच्या बरोबर स्वाभिमान टिकवून राहीले. तर पाहुण्याचे नाते निर्माण झाल्याने भगतांना खोतांच्या रयतेशी नाळ जुळवून घ्यावी लागत आहे. सद्या अनिल पवार आघाडीच्या स्टेजवर वावरत आहेत. नाही म्हणायला त्यांच्याबरोबर माजी उपसभापती नाना पुजारी ही दिसत आहेत. पुजारी यांना आघाडी धर्माबरोबरच स्वत:च्या बनपुरी गावातील विरोधी श्रीरामाचे सैन्य त्यांच्या नेत्याच्या आदेशाने भाजपाच्या कळपात घुसल्याने ही भूमिका सोयीस्कर आहे. त्यातच पंचायत समिती निवडणूकीपासून निमसोडचे नेते नंदकुमार मोरे यांच्याशी असणारा जिव्हाळा अद्याप टिकून आहे. तानाजी देशमुख अद्याप शेतीकामात मशगुल आहेत.श्री. भगत यांनी अद्याप घर सोडले नाही. तसेच निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघास मंत्री सदाभाऊं खोतांचे दर्शन झाले नाही. त्यामुळे मागील निवडणूकीत पोत्याने मते दिलेले गावोगावचे मतदार म्हणत आहेत. कोठे नेवून ठेवले आहे आमच्या सदूभाऊस ….
मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कट्टे-पाटील आपल्या आक्रमक शैलीबद्दल खटाव-माणसह जिल्हाभर प्रसिध्द आहेत. निवडणूका जाहीर होण्याअगोदर निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासमवेत त्यांचे फ्लेक्स बोर्ड झळकत होते. मात्र आता ऐन निवडणूकीत कट्टे-पाटील गेले कोणीकडे असा सवाल राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे.
माढा मतदारसंघात मित्रपक्ष असून अडचण नसून खोळंबा
RELATED ARTICLES

