रेठरे : ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे सांगत सत्तेवर आलेले भाजप सरकार प्रत्यक्षात आजवरचे सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. हुकुमशाही वृत्तीच्या नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी आपण सारे एक झालो आहोत. काहीही झाले तरी पुढील प्रंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील, या निर्धाराने प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन माझी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
रेठरे, ता. कराड येथे राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब पाटील, आ. आंदराव पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड जनता बँकेचे राजेश पाटील वाठारकर, अॅड. राजाभाऊ पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवत 2014 च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने केवळ 31% मते मिळवली होती. विरोधातील 69 % मते मिळालेल्या सर्वांची मुठ बांधून आता भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आपण सारे सिद्ध झालो आहोत, असे सांगून आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, वास्तविक ज्यांनी शून्यातून भाजप उभा केला अश्या नेत्यांनाही मोदी आणि शहा या जोडगोळीने या निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन, मुरलीमनोहर जोशी अश्या नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाहेर ठेवण्याचा कृतघ्नपणा सत्तेची ऊब लागताच भाजपच्या सध्याच्या नेतेमंडळींनी केला आहे. आपल्या पक्षातील ज्येष्ठांना अशी वागणूक मिळत असेल तर नरेंद मोदी जनतेला काय सांभाळून घेणार? आम्हीपण राजकारण केले पण वैयक्तिक टीका – टिप्पणी आम्ही कधी केली नाही. आम्ही केवळ विचारांचे राजकारण केले. मात्र सध्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाचे बीज भाजप सरकार पेरत आहे. सैनिकांनी केलेल्या कामगिरीवर दंड थोपटण्याचा प्रकार मोदी करतात. राफेल विमान खरेदीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. नरेंद्र मोदींवरील चित्रपट आणि टीव्ही वाहिनी इलेक्शननंतरच सुरू करा असेही त्यांना फटकारले आहे. हे लक्षात घेता मोदी सरकारची आता ओहोटी सुरू झाली आहे, हेच सिद्ध होते. केवळ दोन- अडीच माणसांचे हे सरकार महागाईवर नियंत्रणासाठी शेती मालाचे दर पाडते. साखर, तूर, दूध पावडर आयातीचा निर्णय घेते अणि डिझेल- पेट्रोलचे दर भडकवतात, हे अत्यंत चुकीचे आहे. 89 लाख शेतकर्यांना 34 हजार कोटी कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर मूग गिळून बसतात ही त्यांची अकार्यक्षमताच आहे. या सरकारने 2 कोटी नवीन रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात 1 कोटी रोजगार नष्ट झाले. हे पाहता दररोज 27 हजार नोकर्या गेलेले लोक या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
खा. श्री. छ उदयनराजे म्हणाले की, आपला देश कृषीप्रधान असून देशाची आर्थिक नाडी आणि अर्थसंकल्पसुद्धा शेतीवर आधारित असायला हवा. मात्र नोटबंदीं, जीएसटी आणि रेरासारखे निर्णय अक्षरशः झोपेत घेत मोदींनी देशाची अर्थव्यवस्था खीळखीळी केली. छत्रपती शिवरायसुद्धा अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून कोणताही निर्णय घेत असत. मात्र कोणाचाही सल्ला न घेता मोदी आपलीच मनमानी संपूर्ण देशावर लादत आहेत. मन की बात करीत सत्ता मिळवलेल्या या सरकारने हातामध्ये सत्ता येताच घेतलेल्या अविचारी निर्णयांमुळे जनतेची अक्षरशः धुळदान केलेली आहे.
जनतेची केवळ मते त्यांनी मिळवली, मात्र जनतेच्या वैचारिक मतांची काहीच किंमत ठेवली नाही. देशाची नैसर्गिक संपत्ती काही ठराविक उद्योजकांच्या दावणीला बांधून जनतेला अक्षरशः ओरबाडण्याचे काम या सरकारने केले आहे. आमदार- खासदार हे केवळ निम्मितमात्र असतात, जनता हीच खरी राजा असते. मात्र सत्तेत गेल्यावर जनतेला विसरणार्या सरकारला धडा शिकवण्यासाठी सत्तांतराशिवाय पर्याय नाही. तरुणाई व विद्यार्थी ही देशाची संपत्ती व आधारस्तंभ आहे. त्यांना घडवूनच देशाला महासत्तेकडे नेता येईल, मात्र देशाचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नसेल, तर अनेक राष्ट्रांना हेवा वाटावा असा भारत घडवूया. व्यापारी, उद्योजक, शेतकरी हे सर्व घटक सक्षम करण्यासाठी सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, असे सांगत मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाचे आश्वासन देत, एक बार मैने कमिटमेंट कर दी, हा प्रसिद्ध डायलॉग खा. उदयनराजे यांनी सादर करताच उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
भाजप सरकार प्रत्यक्षात सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार : खा. उदयनराजे
RELATED ARTICLES

