सातारा: 45- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी ज्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात त्यांना कुठेही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी आज केल्या.

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज लोकसभा निवडणूक-2019 अच्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्षांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार रोहिणी आखाडे आदी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेत व्हिव्हिपॅट या मशिनचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. ईव्हिएम बरोबर व्हिव्हिपॅटची कार्यप्रणाली समजून घ्या. हाताळता येत नसतील तर त्या वारंवार हाताळा, असे सांगून श्री. झा यांनी ईव्हिएम व्हिव्हिपॅट विषयी सविस्तर माहिती सांगितली.
या मशिनच्याद्वारे मतदाराला आपण कुणाला मतदान केले आहे हे 7 सेकंदसाठी दिसणार आहे. यामुळे मतदाराच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही, असे सांगून श्री. झा यांनी केंद्राध्यक्षांची जबाबादारी व कर्तव्याची माहिती सांगितली.
या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

