कोरेगाव ः सातार्यात दहशत अन् स्टाईल काय घेऊन बसलात नवीन डायलॉगचे फॅड आले असून तरुण पिढी, आता माझी सटकली आणि अपना टाईम आयेगा हाच डायलॉग मारत आहे. सातार्याची हवा बदलली असून, परिवर्तन अटळ आहे. तसेच सातारा जिल्ह्यात खूप काही करण्यासारखे आहे, मात्र दहशतीमुळे येथे उद्योग व्यवसाय कारखानदारी येत नाही. काहीही झाले तरीही देशात पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसणारा खासदार हवाच कशाला. विरोधक देश तोडायला निघालेत. त्यामुळे देश अखंड व भगवा ठेवण्यासाठी महायुतीला मत द्या. सातार्यातील दहशतीला का घाबरता? सातार्यामध्ये नरेंद्र पाटील यांना मत म्हणजेच दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांना मत असे समजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना घरी बसवा, असे आवाहन शिवसेनेच्या युवा आघाडीचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.
कोरेगाव येथील बाजार मैदानावर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचाराचानिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे उपनेते नितिन बानुगडे पाटील, ना. नरेंद्र पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, मालोजी भोसले, दत्ताजीराव बर्गे, निलेश बर्गे, अक्षय बर्गे, आदी प्रमुख उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, दहशतीला का घाबरता. हातात भगवा घ्या मग कोणीही चिरीमिरी समोर येण्याचे धाडस करणार नाही. एक चायवाला नरेंद्र देशाचा पंतप्रधान होऊ शकतो मग आपल्यातीलच एक माथाडी कामगार असलेला नरेंद्र हा साताराचा खासदार होऊ शकत नाही का? सध्या सगळीकडेच भगवी लाट आहे, तशीच ती सातारा व कोरेगाव मध्ये ही दिसत आहे. सातार्यात फिल्मी डायलॉग ची चलती आहे. त्यावरून मी सांगतो आता पेटून उठलेला तरुणही म्हणतोय आता माझी सटकली गल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या रूपाने शिवसेनेचा खासदार निवडून आला. कोरेगावात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची मी ग्वाही देतो. काँग्रेस आघाडीच्या सरकारने ठेकेदारी प्रवत्ती जोपासत राज्याची वाट लावली. सातारा जिल्ह्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित असून त्याला मागील सरकार कारणीभूत आहे.
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, सातार्याच्या खासदारांना दहा वर्षात काही करता आले नाही. काँग्रेसचे सरकार असताना त्यांना कसलीही ठोस विकासकामे करता आली नाहीत. सातार्यातील दादागिरी थांबवण्यासाठी शिवसेनेचे संवेदनशील उमेदवार नरेंद्र पाटील यांना बहुमताने निवडून द्या.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, या निवडणुकीत मी उदयनराजेंना पाडणारच आहे. निकालानंतर ते माजी खासदार होतील. गेल्या दहा वर्षात काय कामे केली असा प्रश्न विचारला तर ते शत्रुघ्न सिन्हा सारखं खामोश असा डायलॉग मारतात. पैशासाठी सोना अलाइज कंपनी बंद पाडून अडीच हजार कामगारांना बेकार करणारे हे गरिबांच्या जिवावर जगतात. गेल्या दहा वर्षात खासदारांनी किती विकास केला. किती कारखाने घालवलेत याचा हिशोब दिला पाहिजे. भाजप शिवसेनेने केलेले कामे आपण केल्याचे सांगतात. दुसर्याच्या पोराला आपलं पोर आहे, असे किती दिवस सांगणार आहात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. रणजित भोसले यांनी प्रास्ताविक केले. नितिन बानुगडे पाटील, शारदा जाधव, शेलार, यशवंत घाडगे आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसैनिक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना घरी बसवा
RELATED ARTICLES

