Saturday, January 24, 2026
Homeताज्या घडामोडीदुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी सातार्‍याचे संदीप गुप्ते यांची निवड

दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी सातार्‍याचे संदीप गुप्ते यांची निवड

साताराः दुबई, युएई येथे गेली 47 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि तमाम मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणार्‍या दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी मूळ सातारा शहराचे रहिवासी असलेल्या संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे.  आपल्या पुढील पिढीसाठी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणा करणे आणि वृध्दींगत करणे. तसेच आपल्या मायबोली मराठीचा उज्वल आणि गौरवशाली वारसा जपणे. दुबई, युएई मधील मराठी माणसाला एकत्रीत ठेवून आपली उज्वल संस्कृती आणि परंपरा परदेशातही टिकवून ठेवण्याचे कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून सातत्याने केले जात असते. याच मंडळाच्या अध्यक्षपदावर सातारा शहरातील मंगळवार पेठेत बालपण घालवलेले संदीप गुप्ते यांची निवड झाली आहे.  मंगळवार पेठेतील रहिवासी आणि अनंत इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले संदीप गुप्ते हे उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक झाले. दुबईतील एका बड्या कंपनीत आटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे संदीप गुप्ते यांनी गेली 24 वर्ष विविध आखाती देशांत मराठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले असून त्यांनी यापुर्वी मस्कत व दुबई महाराष्ट्र मंडळाचे सचिव म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे. दरम्यान, सन 2019 ते 2020 या कालावधीसाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असून आपल्या मायबोली मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य नेटाने केले जाईल, असे निवडीप्रसंगी गुप्ते म्हणाले.  या निवडीबद्दल गुप्ते यांचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दूरध्वनीवरुन अभिनंदन केले. गुप्ते यांच्या निवडीमुळे सातार्‍याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून आम्हा सातारकरांना तुमचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुप्ते यांना शुभेच्छा दिल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, माजी उपनगाध्यक्ष अविनाश कदम, डॉ. संदीप श्रोत्री यांनीही गुप्ते यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभच्छा दिल्या. निवडीबद्दल गुप्ते यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular