सातारा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सातारचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी पोलिस नाईक हुतात्मा नितीन जमदाडे यांच्या कुटुंबियांची फॉरेस्ट कॉलनी येथील घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी जमदाडे यांची आई, पत्नी, मुलगा, मुलगी तसेच भाऊ यांची चौकशी केली.
यावेळी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले की, नितीन जमदाडे हे आमचे कुटुंबियच आहेत व त्यांच्या कुटुंबियांना आमच्यापरीने सर्व काही मदत आम्ही करु तसेच हुतात्मा नितीन जमदाडे हे ड्युटी संपवून भुईंजवरुन सातारला घरी परत येत असताना अपघातप्रसंगी मदतीला थांबले व त्यात बसची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ड्युटी संपली असताना सुध्दा त्यांनी कर्तव्य बजावले हे विशेष उल्लेखनीय आहे असेही ते म्हणाले. व तीन जिल्ह्यातील पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार जमदाडे यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनीही आपण जमदाडे कुटुंबियांच्या पाठीशी आहेत व त्यांच्या दु:खात सहभागी आहोत असे सांगितले.
यावेळी विलासपूरचे माजी उपसरपंच शशिकांत पारेख व अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे यांनी हुतात्मा जमदाडे यांच्या मुलाला किंवा पत्नीला नोकरीत सामावून घेण्याची विनंती केली.