पाटण :- छत्रपती शिवकाळातील पाटण महालात प्रमुख असलेल्या सुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) असलेल्या “गजलक्ष्मी तलवार” विहिरीतील शंकराच्या मंदिरातील शिवलिंगावर महाशिवरात्र निमित्ताने पंचामृत दुग्धा अभिषेक, पुजा पाठ, महाआरती,भजन करून छत्रपती शिवभक-शिवमावळ्यांनी महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरी केली. महाशिवरात्र निमित्ताने सुंदरगडावरील “गजलक्ष्मी तलवार” विहिरीतील शंकराच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
पाटण येथून जवळच असलेल्या सुंदरगडावर काळ्या कातळात खोदलेली भव्य “तलवार” आकाराची विहिरी आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे “शिवलिंग” असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर “गजलक्ष्मी” हत्ती कोरलेला आहे. यावरून या विहिरीला “गजलक्ष्मी तलवार विहिर” म्हणले जाते. या तलवार विहिरीच्या पात्यापासून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यां कोरलेल्या आहेत. या पाय-या वरून विहिरीत उतरले की डाव्या बाजूला “शिवलिंग” असलेले शंकराचे मंदिर आहे. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी हि “गजलक्ष्मी तलवार वीहिर” सुंदरगडाचे आकर्षण आहे. या विहिरीत असलेल्या शिवमंदिरात शिवभक्त मावळ्यांनी महाशिवरात्र उत्सव साजरा केला. या मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत अभिषेक, पुजा- महाआरती, आणि टोळेवाडी ग्रामस्थांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित केला. महाशिवरात्र निमित्त शिवभक्त पर्यटक यांनी “गजलक्ष्मी तलवार” विहिरीतील शिवमंदिरात गर्दी केली होती. किल्ल्यावर महाशिवरात्र उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी अविनाश पराडकर (काका), शंकराव कुंभार, महादेव खैरमोडे, काशिनाथ विभुते, नारायण डिगे, शंकर मोहिते, अनिल बोधे, अनिश चाऊस, निलेश फुटाणे, रामचंद्र साळुंखे, आनंदा साळुंखे, कोंडीबा साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.
सुंदरगडावरुन आजुबाजुच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य सह्याद्रीच्या रांगा, कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, वसंतगड, गुणवंतगड या किल्ल्यांचे सहज होणारे दर्शन, किल्ल्यावरून दिसणारा सुर्यास्त आणि पायथ्याला असणाऱ्या पाटण शहराचा परिसर दिवसेंदिवस शिवभक्त पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याबरोबर किल्ल्याच्या महाव्दारात भव्य असणा-या श्रीगणेश आणि वीर हनुमानाच्या आकर्षक मृर्ती देखील पाहाण्यास व त्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.