फलटण : थोर साहित्यिक, विचारवंत व रसिक वाचक, सुसंस्कृत राजकीय नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे देण्यात येणार्या यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.आनंदराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर ग्रामीण जीवनाचा सहकाराच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी सहकारी चळवळीला योग्य दिशा देणार्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या; साताराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रविंद्र भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण सोमवार, दि.27 नोव्हेंबर रोजी येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या सहाव्या एक दिवसीय स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी जागतिक मराठी अकादमी, मुंबईचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
संमेलनाचे उद्घाटन दि.27 रोजी सकाळी 10:30 वाजता रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी डॉ.सोपानराव चव्हाण (पाटण) व विनोद कुलकर्णी (सातारा) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार विजेत्यांची माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी प्रा.डॉ.आनंद पाटील हे व्यासंगी वक्ते, संशोधक व सृजनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. 40 वर्षे अध्यापन, प्रशासन व संशोधन क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा व साहित्य संकुलाचे ते पहिले प्राध्यापक संचालक आहेत. आजवर त्यांच्या ग्रंथांनी रचलेले यशवंतराव चव्हाण, कागद आणि सावली, इच्छा मरण या कादंबर्या, फुगंड्या, दावण, सुपर्ण वृक्षाखाली भर दुपारी, फेरा, खंडणी, शोध एका चळवळ्या मित्राचा, निवडक आनंद पाटील हे कथासंग्रह, पाटलाची परदेशवारी, परदेशी सहा परिक्रमा ही प्रवासवर्णने प्रसिद्ध झाली आहेत. विविध विषयांवरील तौलनिक साहित्य, ग्रंथांचे अनुवादही त्यांनी केले आहेत.
सहकार गौरवफ पुरस्काराचे मानकरी डॉ.रविंद्र भोसले हे व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर असून ते धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था, साताराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ऑक्टोबर 1989 साली डॉ.भोसले यांनी त्यांच्याच पेशातील समविचारी डॉक्टरांना एकत्रित घेवून या संस्थेची स्थापना केली. सातारासह पुणे, पिंपरी चिंचवड, फलटण, कराड, कोरेगाव या ठिकाणी संस्थेचा शाखाविस्तार असून या सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सहकारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन 2015-16 साली पुणे महसूल विभागातील सहकार भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व सातारा जिल्हा फेडरेशकडून आदर्श पतसंस्था म्हणूस संस्थेचा गौरव झाला आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकतेचा ध्यास घेवून डॉ.रविंद्र भोसले सलग 28 वर्षे कार्यरत आहेत. संमेलनाबाबत अधिक माहिती देताना मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले यांनी सांगितले की, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण, यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, फलटण, श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.27 नोव्हेंबर 2017 येथील महाराजा मंगल कार्यालयात एकदिवसीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाफच्या पहिल्या सत्रात स.10:30 ते दु.1:30 या वेळेत संमेलनाचा उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार व यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराचे वितरण होईल. संमेलनाच्या दुसर्या सत्रात दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचा महाराष्ट्रफ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून यामध्ये प्रा.शिवाजीराव देशमुख (सोलापूर), प्रा.नवनाथ लोखंडे (फलटण) सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राचार्य रविंद्र येवले भूषविणार आहेत. त्यानंतर प्रा.रविंद्र कोकरे (फलटण) व ज.तु.गार्डे (कापशी) यांच्या कथाकथनानाने संमेलनाचा समारोप होणार आहे.
तरी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महाराष्ट्रात एकमेव होणार्या या एकदिवसीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनासफ साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजीराव सूर्यवंशी (बेडके), श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) व म.सा.प.फलटण शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.रविंद्र कोकरे, कार्यवाह प्रा.विक्रम आपटे, अमर शेंडे यांनी केले आहे.