सातारा : गुजरवाडी ता. कोरेगाव येथे हिंदूस्थान शुगर्स नावाने खासगी साखर उद्योगाची नोंदणी करुन त्याद्वारे जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचे शेअर्स गोळा करुन संबंधित कारखान्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. संबंधित कारखान्याच्या जमीनविक्रीचा घाट संचालकांनी घातला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांनी लक्ष घालून ङ्गहिंदूस्थान शुगर्सफच्या जमीन विक्रीचे व्यवहार त्वरित थांबवावेत व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली असून त्याची प्रत साखर आयुक्त, साखर संचालनालय, पुणे यांनाही पाठवली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे की, कोरेगाव तालुक्यात गुजरवाडी येथे कारखाना कार्यस्थळ दाखवून हिंदूस्थान शुगर्स लि. या साखर उद्योगाची नोंदणी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विशेषत: सातारा, कोरेगाव, खंडाळा, वाई, फलटण आदी तालुक्यातील शेतकर्यांना शेअर्स विक्री करण्यात आली आहे. सन 2010 पासून 5000 रुपयांचा एक शेअर्स याप्रमाणे हजारो शेतकर्यांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम कारखान्याकडे जमा झाली आहे. मात्र, कारखान्याकडून आजअखेर कोणताही परतावा किंवा शेअर्सच्या लाभापोटी काहीही रक्कम सभासदांना आदा केलेली नाही. साखर कारखान्याचे सभासद म्हणून मिळणार्या कोणत्याही लाभाची आजवर संबंधित शेतकर्यांना प्राप्ती झालेली नाही. सातारा जिल्ह्यात गुजरवाडीच नव्हे तर अन्यत्र कोेठेही या कारखान्याच्या उभारणीबाबत प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. या कारखान्याबाबतची उभारणी पातळीवरील कोणतीही बातमी अथवा जाहिरात प्रसार माध्यमांमध्ये आल्याचे ऐकिवात नाही. केवळ कारखाना नोंदणी आणि जमीन खरेदी एवढ्याच हालचाली या कारखान्याबाबत झाल्या आहेत. आपल्या भागात कारखाना होत असल्याने आणि अन्य कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर मिळेल, व वेळेत ऊसतोड होईल या भावनेने शेतकर्यांनीही आपल्या घामाचे पैसे या कारखान्याच्या शेअर्सपोटी गुंतवले. केवळ शेअर्स विक्री करण्यासाठी गावोगावी फिरणारे प्रतिनिधीही सध्या कोठेच दिसून येत नाही. संबंधित कामासाठी काही स्थानिक बेरोजगार युवकांना नियुक्त करण्यात आले होते. मुळात त्यांनी गोळा केलेले शेअर्सचे पैसे कंपनीच्या अधिकार्यांकडे जमा केल्याने तेसुद्धा जबाबदारी झटकून टाकतात. कारखान्याच्या अधिकार्यांचे पूर्वी दिलेले मोबाईल नंबर आता बंद आहेत. त्यामुळे याबाबत संबंधितांना शोधावयाचे कसे? हा प्रश्न भोळ्याभाबड्या शेतकर्यांसमोर आहे. अन्य कारखान्यांपेक्षा अधिक ऊसदर मिळेल आणि शेअर्सद्वारे लाभांश प्राप्त होईल, या आशेपोटी कारखान्याचे शेअर्स घेतलेल्या शेतकर्यांची याबाबत फसवणूकच झाल्याचे आता स्पष्ट होत आहे.
गेल्या सात वर्षांपासून शेअर्सची कोट्यवधी रुपयांची रक्कम कारखाना व्यवस्थापनाने बिनव्याजी वापरली आहे, हा एक प्रकारे अपहारच असल्याची अनेक शेतकर्यांची भावना आहे. वास्तविक हिंदुस्थान शुगर्स हा साखर उद्योग उभा न राहताच सभासदांच्या घामाच्या पैशातून कारखान्याच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीच्या विक्रीचा घाट संबंधितांनी घातला आहे. जर कारखाना संचालकांनी जमीन विक्रीच्या हालचाली केल्या तर सभासदांच्या हक्कावर गदा येऊ शकते. त्यामुळे दुय्यम निबंधकांना आदेश देऊन संबंधित कारखान्याच्या नावावरील कोणत्याही जागांचे विक्रीचे व्यवहार होऊन देऊ नयेत, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच शेतकर्यांचे घामाचे पैसे संबंधित संचालकांच्या व कारखान्याच्या मालमत्ता विक्री करुन सव्याज द्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. असेही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे.
वसुली प्रतिनिधी गायब, संचालक मंडळाचा पत्ताच नाही आणि अधिकार्यांचे फोन बंद अशी विचित्र स्थिती झाल्याने शेतकर्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशा अवस्थेला सामोरे जावे लागत आहे, असेही संदीपदादा मोझर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बाबत प्रशासनाकडून टाळाटाळ झाल्यास आम्ही ङ्गमनसे स्टाईलफ ने तीव्र आंदोलन करु, कोणतीही पूर्व कल्पना न देता केल्या जाणार्या या आंदोलनामुळे उद्भवणार्या जनक्षोभ व उसळणार्या आंदोलनातून होणार्या सार्वजनिक नुकसानीला शासनच जबाबदार असेल, असेही याबाबतच्या निवेदनात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान शुगर्सचे शेअर्स घेतलेल्या शेतकर्यांनी आपल्या शेअर्स सर्टिफिकेटच्या झेरॉक्स प्रतीसह मनसेच्या पिरवाडी (गोरखपूर) येथील कार्यालयात (02162-229933) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन देताना मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्यासमवेत सचिन पवार, मधुकर जाधव, बाळकृष्ण तात्या पिसाळ, सुभाषमामा चौधरी, दिलीप तात्या सुर्वे, राहुल पवार, राजेंद्र बावळेकर, अश्विन गोळे, चंद्रकांत बामणे, शिवाजी कासुर्डे, सागर बर्गे, आशिष चोरगे, ओमकार नावेलकर, संतोष गोळे, चंद्रकांत पवार, अमित यादव, दिलीप सोडमिसे, अधिक सावंत, देवेंद्र कणसे, सुशिल कदम आदी उपस्थित होते.