अॅड. अंजली झरकर,पुणे मो.नं.:7588942787
______________________________________________
डी. एस. कुलकर्णी यांच्याबद्दल राग अथवा द्वेषाचा विषय नाही. कधीतरी कुठला तरी मराठी माणूस नोकरीच्या चक्रव्यूहात न अडकता शून्यातून एखादं औद्योगिक विश्व उभं करतो ही कौतुकास्पद गोष्ट नक्कीच आहे. कुठलाही उद्योगपती उद्योग सुरु करताना मी आता 100% लोकांना लुटूनच उद्योग करणार अशी मनीषा ठेवून उद्योगात उतरत नसतो कारण जोपर्यंत लोकांना फायदा होईल अशी काहीतरी वस्तू, सेवा तो देत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणे शक्य नसते.
तसे जर झाले नाही तर कशाला काही अर्थच राहणार नाही आणि त्याला यश ही मिळणार नाही. पण जसजसा उद्योगाचा पसारा वाढतो तसतशी मुल्ये सुद्धा बदलत जातात.
यश, नफ्याच्या पुढे नैतिकता नेहमी मार खात राहते. पण जोपर्यंत हे परस्पर फायदा मिळवायचं चक्र सुरु आहे तोपर्यंत कितीही नियम तोडून वागले तरी त्याची भीती नसते पण जेव्हा हा परस्पर फायदा मिळणे बंद होवून जाते त्यावेळी नियम, कायदे दोघाही पक्षांना आठवतात आणि मुळापासून सगळ्याच गोष्टींचा कीस पाडण सुरु होतं. DSK GROUP बाबत सध्या तेच होतंय.
दीपक सखाराम कुलकर्णी, DSK हे मराठी उद्योग विश्वातील प्रसिद्ध नाव, ज्यांना 8 ते 8 च कार्पोरेट जोखड मानेवर न घेता स्वत:च विश्व घडवायचं त्यांच्यासाठी असणारी सर्वात मोठी प्रेरणा. ते माझी सुद्धा प्रेरणा आहेत! भाजी विकणारा, फोन चे रिसीव्हर पुसणारा माणूस स्वत:च्या कर्तुर्त्वावर मोठ औद्योगिक साम्राज्य उभा करतो. प्रसिद्ध बिल्डर होतो.
अनेक मध्यमवर्गीय आणि छोट्या कमाई वर्गाला स्वत:च्या घराच स्वप्न दाखवतो आणि ते पूर्ण ही करून देतो. मराठी माणसाला तशी अवघड वाटणारी गोष्ट. ती त्यांनी करून दाखवली म्हणून ते आदर्श झाले.
2012 साल ची गोष्ट असेल जेव्हा पहिल्यांदा मी त्यांना त्यांच्या पुण्याच्या जंगली महाराज रस्त्याच्या ऑफिसमध्ये पाहिले होते. LLB. चा ठप्पा माथी घेवून भारतातल्या तथाकथित top most law institute आणि स्वत:चच स्वत:ला पूर्वे कडचे केम्ब्रिज ऑक्सफर्ड (मला हाणा, मारा पण सलमान खान म्हणा च्या धरतीवर) म्हणवून घेणार्या university factory मधील संयुक्त विद्यमाने तयार झालेले म्हणून मिरवून घेतल्यानंतर रूमच्या अंधार्या कोपर्यात भविष्याची रंगीन स्वप्ने तासनतास सुन्न बसून शोधात राहण्याचा तो काळ होता.
तशात एक दिवस आई माझ्याकडे आली आणि मला DSK च्या ऑफिसमध्ये घेवून चल म्हणून घेवून गेली. जे एम रोड वरची ती तीन का चार मजली इमारत म्हणजे DSK GROUP अलिशान ऑफिस आहे. तिथे गेल्यावर तिथल्या EXICUTUVE मुलीने आमचा ताबा घेतला होता.
दुसर्या मजल्यावर ऐसपैस बसून समोर आलेलं पाणी पीत आजूबाजूची शोभा न्याहाळत बसले असताना आईने तिच्या जवळच्या साध्या कापडी पिशवीतून काळजीपूर्वक जपून ठेवलेला वृत्तपत्राचा तुकडा काढला आणि त्या मुलीला विचारले
या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे DSK साहेब आमच्या ठेवीना 14% व्याज देणार हे खर आहे का?
ते ऐकून माझा घोट (पाण्याचा) घशात अडकला. आमचा येण्याचा हेतू त्यांना कळल्यावर समोरच्या माणसांच्या चेहर्यावर स्मित हास्य विलसलं. आमच्या साठी चहाची ऑर्डर सोडण्यात आली आणि माझ्या आई ला संपूर्ण एफ डी ची स्कीम समजावून सांगण्यात आली. हे सगळ ऐकत असताना आईचा चेहरा विचारात पडला होता. सगळ ऐकून झाल्यावर आम्ही त्यांना काय ते कळवतो असे सांगून उठलो. लॉबीमध्ये तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट ची वाट पाहत असताना लिफ्ट चा दरवाजा उघडला आणि साक्षात DSK त्यांच्याबरोबर च्या 2 -3 परदेशी लोकांशी बोलत बाहेर आले. मोठ रुबाबदार आणि ताठ व्यक्तिमत्व! (लोकांना तो त्यांचाताठावाटतो. लोकांची चूक! असो.)
घरी आल्यावर मी आई ला निक्षून सांगितलं की हे बघ DSK पेक्षा जास्त विश्वास मला तुझ्या सारख्या आयुष्यभर खस्ता खावून सरकार ची नोकरी प्रमाणिकपणे केलेल्या चाकरमान्यांच्या खडतर नशीबावर आहे. वाईटात वाईट काय घडल तर उद्या तुझा हा आयुष्य घालवून साठवलेला तुटपुंजा पैसा गेलाच तर मी काय साक्षात ब्रम्हदेव जरी खाली आला तरी मिळण मुश्कील आहे आई.
त्या काळात हे ज्ञान मला माझ्या वकिलीच्या डिग्री मुळे आलेलं नव्हत. मी खूप लहान होते (अर्थात तशी मी आताही आहे.) आणि खूप सार्या गोष्टी तपासून पाहण्याचं प्रसंगावधान माझ्याकडे नव्हत. शेवटी चर्चा आणि विवादाच्या बर्याच फेर्या झाडल्यानंतर आईने किरकोळ व्याजात तिचे पैसे राष्ट्रीयकृत बँके मध्ये ठेवले. या घटनेला आता 5 वर्षे झाली.
DSK कडे त्यांच्या ठेवीदारांना देण्यासाठी पैसे नाहीत अशी बातमी आल्यावर आईने फोन केला आणि माझा निर्णय किती योग्य होता हे ऐकवलं ते ऐकून मला वाईट वाटलं. आम्ही पैसे गुंतवले नाहित कारण माझं अंतर्मन मला काहीतरी वेगळा संदेश देत होतं. ही अंतर्मन ची व्याख्या ज्याच्या त्याच्यासाठी वस्तुनिष्ठ असते.
Intuition झालं म्हणून पैसे गुंतवले, intuition झालं म्हणून पैसे नाही गुंतवले हे वाक्य गुंतवणुकीच्या बाबतीत आपण माकड झालेलो आहोत हे दर्शवते. (त्या अर्थाने माकड आपले पूर्वज होते अस मानायला हरकत नसावी!).
प्रत्येक गुंतवणुकीत काहीना काही धोके असतात आणि त्या धोक्यांचा background check करून पैसे गुंतवावे लागतात. धोके कसे कमी करता येतील आणि मिळणारे फायदे कसे वाढवता येतील याचे गणित सतत मांडत राहावे लागते. Intuition तर असावं जरूर आणि ते विकसित करण्यासाठी प्रयत्न ही करावेत पण त्या आधी पैसा कसा फिरतो आणि कायदा कसा अडकवतो हे समजून घेतलं तर आयुष्यातले निम्मे त्रास असेही कमी होवून जातील.
2013 साली सुधारीत कंपनी कायद्याचे मॉडेल लागू करण्यात आले. त्यात पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी लोकांकडून ठेवी गोळा करण्या संदर्भातील नियम कडक करण्यात आले. आपण चालवत असलेल्या मुदत ठेव योजनेचे क्रेडीट रेटिंग जाहीर करणे, ठेवी परत देण्यासाठी 20% रकमेची आगावू सोय करणे अशा जाचक वाटणार्या अटींमुळे अनेक पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी 2014 नंतर आपल्या fd schemes बंद केल्या. अपवाद अर्थात DSK सारख्यांचा.
बांधकाम कंपनी जेव्हा लोकांकडून पैसे ठेवींच्या रुपात गोळा करतात तेव्हा तो तसाही वादाचा मुद्दा म्हणून गाजतो.बँक किंवा आर्थिक वित्तसंस्थांकडून कर्ज घेतल्यावर त्यावरचा अव्वाच्या सव्वा रेट भरणे बिल्डरला जड वाटते त्यामुळे लोकांकडून ठेवी गोळा करून त्यावर बँके पेक्षा थोड जास्त दर देवून तो पैसा वापरणं त्यांच्या पथ्यावर पडते.
हरकत नाही. हे काही बेकायदेशीर कृत्य नाही पण ते संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत किंवा कक्षेत सामावलेलं नाही. 2013 साली त्या संदर्भात कंपनी कायद्या मध्ये बर्यापैकी सुधारणा करून या activity regularize करण्याचा प्रयत्न झालाय. पण जेव्हा तुम्हाला बँके पेक्षा जास्त व्याज खायचं असत तेव्हा अशा कंपनी मध्ये पैसा गुंतवण्या अगोदर काय तपासाल पाहिजे याची माहीत किती जणांना असते.
1. आपण ज्या कंपनी मध्ये पैसे गुंतवतोय ती कंपनी खरच नोंदणीकृत आहे का?
2. ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे का?
3. त्या कंपनीचा आतापर्यंतचा आर्थिक ताळेबंद कसा आहे?
4. कुठल्या नावाखाली तुमच्या कडून पैसा गोळा केला जातो?
5. कंपनीच्या किती स्कीम्स पूर्णत्वास गेल्या आहेत किती अपूर्ण राहिल्या आहेत?
6. किती प्रकल्प बँक आणि वित्तसंस्थे कडे गहाण ठेवले गेलेले आहेत?
7. ज्या कंपनी मध्ये आपण पैसे गुंतवतोय ती खरी आहे की फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहे?
8. कुठल्या कागदपत्रावर तुम्ही सही करताय?
9. यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो पैसा बिल्डर कडे दिलाय तो त्याने त्याच्या व्यवसायासाठी न वापरता व्यक्तीगत वापरासाठी वापरला हे तुम्हाला घरात बसून कस कळेल?
अगदी DSK च्या बाबतीतच विचार केला तर DSK यांच्या एकूण 23 ग्रुप कंपन्या आणि नऊ पार्टनरशिप फर्म आहेत. (ही संख्या कदाचित कमी अधिक असू शकते) DSKDL सोडली तर बाकीच्या सर्व कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत.
DSK Developers ही त्यांची मुख्य कंपनी. DS Kulkarni and associates , DS kulkarni & Brothers, DS Kulkarni & Sons, DSK and Sons , DSK Associates या पार्टनरशिप फर्म . DSK Construction & DSK Enterprises या बाकीच्या कंपन्या.
साधारणपणे वर उल्लेख केलेल्या या कंपन्यांतर्फे किंवा पार्टनरशिप फर्म कडून ठेवीदारांच्या ठेवी गोळा केल्या गेलेल्या आहेत. या ठेवी ज्याला आपण corporate deposits अस म्हणतो त्याबाबत आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. या ठेवी कायदेशीर भाषेत unsecured loan म्हणून ओळखल्या जातात.
त्याबाबत RBI, SEBI यांची कुठलीही स्पष्ट, मार्गदर्शनपार तत्वे नाहीत. या ठेवीना RBI ची परवानगी नव्हती हे म्हणणे त्या अर्थाने बरोबर आणि त्या अर्थाने चूक असेही म्हणता येईल. RBI वेळोवेळी सर्क्युलर काढून पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी लोकांकडून ठेवी गोळा करताना कुठला Compliance केला पाहिजे ते सांगत असते.
SEBI बरोबर DSKDL चा करार आहे पण ते फक्त Non convertible debantures साठी. Debantures Am ( fixed deposits) या दोन्ही वेगळ्या टर्म्स आहेत. SEBI ही PUBLIC DEPOSITS गोळा करण्यासाठी कंपनी बरोबर करार वगैरे करत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळ्या गाईडलाईन दिलेल्या आहेत.
कंपनी अॅक्ट 2013 चे सेक्शन 73 ते 76 Companies (acceptance of deposits) rules, 2014 बरोबर वाचले तर पब्लिक लिमिटेड कंपनीने लोकांकडून ठेवी गोळा करताना काय काय Compliance केला पाहिजे हे ढोबळमानाने नमूद केलेले आहे.
आता जेव्हा Dsk नी ठेवी देण्याचे जे भावनिक आव्हान केले होते त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कायदेशीर ज्ञाना पेक्षा लोकांचे चेहरे पाहून प्रतिसाद देणारा हा भारतीय समाज आहे. व्याज आकर्षक होते. लोकांनी ठेवी दिल्या त्या ठेवी Dsk च्या प्रायव्हेट फर्म्स आणि DSKDL या flagship कंपनीच्या नावाखाली इतर ग्रुप कंपन्यांच्या नावावर घेतल्या गेल्या असं सकृतदर्शनी दिसतंय.
प्रायव्हेट पार्टनरशिप फर्म पैसा तर गोळा करू शकते पण तो पैसा unsecured loan म्हणूनच गृहीत धरला जातो. त्याबाबत लोकांना काहीही माहिती न देता corporate deposits च्या नावाखाली पैसा असा फिरवला गेला असेल तर आता प्रश्न आहे हा पैसा गुंतवलेल्या पेन्शनर लोकांचा वाली कोण? कुठल्या कुठल्या कायद्याखाली तक्रार तरी करणार आणि किती काळापर्यंत त्याचा निकाल लागणार?
या कायद्या अंतर्गत तक्रार करण्यासाठी असलेलं लिमिटेशन संपेपर्यंत लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार का नाही? आणि कायद्याची प्रदीर्घ लढाई लढून परत मिळालेला पैसा बघायला हे पेन्शनर गुंतवणूकदार हयात राहणार का?
त्यामुळे DSK च्या बाबतीत मुग गिळून गप्प बसणार्या मायबाप सरकारला किंवा कायदेशीर यंत्रणांना किंवा न्यायालयाला विनंती करण्याच्या आधी या केविलवाण्या हजारो Fd धारक यांची DSK साहेबांना विनंती राहील, नव्हे हात जोडून कळकळीची प्रार्थना राहील.
साहेब तुमचा सुब्रतो रॉय नाही झाला पाहिजे. तुमचा विजय मल्ल्या नाही झाला पाहिजे. तुम्ही माझ्यावर केस दाखल केली तर मी आत्महत्या करील अस म्हणण्याचा कसलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाही कारण तुमचं आयुष्य तुमचं नाही (तुम्ही अस करणार नाहीत पण) यदाकदाचित जर तुम्ही असं केलंत तर तुमच्या बरोबर तुमच्यावर विश्वास ठेवणार्या लाखो ठेवीदारांच आयुष्य तुमच्या बरोबरच फासावर जाईल.
त्याची नुकसानभरपाई देणार कोण? हे सरकार? कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणार्या तुमच्या मृतप्राय कंपन्या का बुरख्याच्या आड थप्प्या रिचवून बसलेले तुमचे नातेवाईक?
कदाचित तुम्ही 100% गुन्हेगार नसालाही पण आज तुमचे नातेवाईक म्हणवणार्या लोकांनी ही वेळ तुमच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांवर आणली त्या नातेवाईकाना तुमचा पाठींबा होता, moral support होता. तुमचा वरदहस्त पाठीशी असल्याविना ते हे काम करू शकले नसते हे सत्य आहे.
सरकार गप्प आहे, SEBI गप्प आहे या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देशातल्या एक से एक निष्णात अर्थतज्ञांची, कायदेतज्ञांची फौज तुम्ही कामाला लावली आहे. त्यांना द्याव्या लागणार्या खर्चाचा भार जसा तुम्ही उचलताय तसाच भार तुम्ही आयुष्याचे शिल्लक दिवस मोजणार्या तुमच्या वृद्ध गुंतवणूकदारांचा ही उचलाल, तसाच भार तुम्ही तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून बँकांच्या गृहकर्जाचे जोखड मानेवर घेवून स्वत:च घर बनवण्यासाठी सगळ उमेदीच आयुष्य पणाला लावणार्या तरुण जोडप्यांचाही उचलाल.
तुमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवलेल्या अनेक लोकांच संपत आलेलं आयुष्य लक्षात घेता कायद्याला आव्हान देवून त्याची अंमलबजावणी कधी होईल याची वाट पाहण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या सदसदविवेकबुद्धीला साद घातली तर कदाचित त्यांचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांना त्यांचे पैसे भेटू शकतात.