सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास चांगलीच सुरुवात झाली असून विद्यमान नगराध्यक्षांच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये यंदा काटे की टक्कर होण्याची वादळापूर्वीची शांतता असली तरी अंतर्गत घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. संतोष (सनी) शिंदे या नव्या चेहर्याची प्रभागात जोरदार हवा असून विजय बडेकर, प्रकाश बडेकर या दिग्गजांचा प्रभाग यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
पालिका निवडणुकीच्या दरम्यान, कायमच चर्चेत असलेला हा प्रभाग प्रकाश बडेकर यांच्या याआधीच्या पालिकेतील दमदार सहभागाने तसेच विद्यमान नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या कार्यशैलीने यंदाही गाजणार अशी चिन्हे आहेत. सध्या हा प्रभाग पुरुषांसाठी अनुसूचित जाती तर महिलांना खुला गटासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागातील अनुसूचित जातींच्या नागरिकांची संख्या पाहता प्रत्येक वेळी या प्रभागाने तत्कालिन पॅनेलप्रमुखांकडे पाहूनच उमेदवाराला मतदान केले आहे. मनोमिलनाच्या माध्यमातून गतवेळेला येथे विजय बडेकर यांनी बाजी मारली असली तरी त्यांची प्रकाश बडेकर या मुरब्बी जाणकाराने चांगलीच दमछाक केली होती. दरम्यान पाच वर्षाच्या शेवटच्या काळात खासदार उदयनराजेंचे कट्टर समर्थक असलेल्या विजय बडेकर यांची या पदावर वर्णी लागली. त्यांच्या वाट्याला नगराध्यक्षपदाचा किती काळ आला हा भाग अलहिदा.
पालिकेचे राजकारण पुन्हा मनोमिलन होणार की नाही या केंद्रबिंदूभोवती सध्यातरी फिरत आहे. त्याअनुषंघाने अनेकांनी मोर्चेबांधणीही केली आहे. नगराध्यक्षांच्या प्रभागातही अंतर्गत डावपेचांना आतापासून सुरुवात झाली आहे. विजय बडेकर यांनी आपले संपर्क कार्यालय सुरु करुन पहिला अध्याय सुरु केला असला तरी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला खासदारांची असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. प्रकाश बडेकर हे कुठेही ओपन झाले नसले तरी त्यांनीही अंतर्गत प्रचाराला प्रारंभ केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान यंदा या प्रभागात संतोष (सनी) शिंदे या पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या चेहर्याने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. गत पाचवर्षाच्या कालखंडात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि स्वत:च्या मायमराठी या चॅनेलच्या माध्यमातून लोकसंग्रह वाढवणार्या या युवा नेतृत्वाला विशेषत: महिला वर्गाचा मोठा पाठींबा मिळत असल्याची चर्चा आहे. अगदी कमी वयात राजकीय क्षेत्राचा असलेला अभ्यास, सामाजिक उपक्रम राबवत कायमच प्रभगातील नागरिकांच्या संपर्कात राहणार्या शिंदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दोन महिन्यांपूर्वीच आपले इरादे स्पष्ट केले होते. या वाढदिवसाला आमदार शिवेंद्रराजेंची उपस्थिती हे नविआच्या गोटात नव्या चेहर्याचा प्रवेश झाल्याचे मानले जात आहे. आमदारांकडून दखल घेतली गेल्याने दहा हत्तीचे बळ आलेल्या शिंदेंनी त्यानंतर आर या पारचा पवित्रा घेत आपला जनसंपर्क आणखीण वाढवण्यावर भर दिल्याचे जाणवते आहे. युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार्या शिंदे यांनी या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवण्यावर दिलेला भर पाहता त्यांनी सर्वांच्या आधी प्रचारात आघाडी घेतली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मनोमिलन झाले आणि हा प्रभाग नविआच्या वाट्याला आला तर महिलांसाठी खुल्या असलेल्या जागेवर संतोष शिंदे यांच्या सौभाग्यवती सोनिया शिंदे यांचा दावा असणार आहे. मनोमिलन झाले नाही तर मात्र, पुरुषांच्या जागेवर नविआकडून संतोष शिंदे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. या प्रभागात शिवसेना, भाजपा, मनसे, रिपाइं या पक्षांना उमेदवार शोधण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या प्रभागात रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर तपासे यांचे निवासस्थान असले तरी राजकीय दृष्टीकोनातून दोन्ही आघाडीतील उमेदवारांना टक्कर देण्याइतपत सक्षम उमेदवार सध्यातरी त्यांच्याकडे उपलब्ध नाही. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी बाळू खंदारे हेही इच्छुक असले तरी त्यांनी आपले पत्ते अजून तरी ओपन केलेले नाहीत. एकूणच विद्यमान नगराध्यक्ष यांचा प्रभाग असल्याने या प्रभागातील राजकीय घडामोडींकडे सातारकरांचे लक्ष आहे. घोडा मैदान अजून किमान दीड महिना लांब असले तरी नगरसेवक पदाची रेस जिंकण्यासाठी अनेकांनी आतापासूनच सरावाला प्रारंभ केला आहे. या रेसमध्ये कोण जिंकणार? कोण हरणार? कोण मध्येच मैदान सोडून काढता पाय घेणार? कोण सैराट होणार? हे प्रत्यक्ष निवडणुुकीच्या आधी सांगता येणार नसले तरी मनोमिलनाच्या गणितावर बरीच समीकरणे जुळणार आणि फिस्कटणार आहेत. शहरातील एकूणच वातावरण पाहता तूर्तास प्रत्यक्ष रेस सुरु होण्याआधी मैदानावरील आपले अस्तित्व अधोरेखीत करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आल्याचे जाणवते आहे, त्याला नगराध्यक्षांचा प्रभाग तरी कसा अपवाद असेल?
नगराध्यक्षांच्या प्रभागात तिरंगी लढत
RELATED ARTICLES