(दै. ग्रामोद्धार) – सातारा शहरात मनोमिलन तुटले आणि पालिकेतल्या सत्ता कारणांचे संदर्भच बदलले. गळ्यातगळा घालून पाच वर्ष मिरवणारे नगरसेवक जात भाई आता दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून समोरासमोर ठाकले आहेत. गतवर्षी 39 पैकी तब्बल 17 उमेदवार मनोमिलनाच्या प्रभावामुळे बिनविरोध निवडून आले होते. मात्र आता तब्बल 243 उमेदवार आणि 13 नगराध्यक्ष रिंगणात आहेत. 11 तारखेनंतर अंतिम लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून आता कोणाला गमतीनेही बिनविरोध निवडून आलो असे म्हणता येणार नाही. अर्थकारणाची गंगा धोधो वाहणार अर्थातच निवडणूक आयोगाची करडी नजर या लक्ष्मी पुत्रांवर राहणार आहे.
गेल्या पंचवार्षिकला सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांच्यातील राजकीय मनोमिलनामुळे 39 पैकी 17 उमेदवार बिनविरोध निवडून येत अर्धी लढाई सोपी झाली होती. मात्र भाजपने यंदा जे आव्हान उभे केले आहे त्यामुळे सार्यांच्याच कमी खर्चात निवडून येण्याच्या गप्पांना कात्री बसली आहे. निवडून यायचे तर बराच खर्च करावा लागणार. इलेक्टीव्ह आणि सिलेक्टीव्ह चेहर्यांना प्रचंड वाव असून ते अर्थ कारणाचा मार्ग कसा चोखाळणार यावरच सातारा शहराची बरीचशी राजकीय गणिते अवलंंबून आहेत. गेल्या पंवचार्षिकेला नगर विकास आघाडीचे पक्षपत्तोत अविनाश कदम, माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे, सुजाता गिरीगोसावी, स्मिता घोडके, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, सुजाता राजेमहाडिक, दिपाली गोडसे, रविंद्र झुटींग, भाग्यवंत कुंभार, दिपलक्ष्मी नाईक, अलका लोखंडे, लीना गोरे, वैशाली राउत, माधुरी भोसले, भारती सोलंकी, मुमताज चौधरी हे सतरा उमेदवार बिनविरोध निवडून गेले होते आणि 22 जागांसाठी निवडणूक लागली होती. मात्र, यंदा बर्याच उमेदवारांना काट्याची टक्कर द्यावी लागणार आहे. मंगळवार तळ्यावर अविनाश कदम यांच्या विरोधात सातारा विकास आघाडीकडून वसंत लेवे यांनी जोरदार शड्डू ठोकला आहे. त्यांचा अपवाद वगळता व इतर काही नावे सोडता तब्बल 15 चेहरे हे यंदा आघाडीच्या स्पर्धेतून बाहेर राहिले आहेत आणि ज्यांनी पाच वर्षे ब्रेक घेतला असे माजी नगरसेवक बाह्या सरसावून पुढे आले आहेत. बोगद्यातून विजय चौगुले, प्रतापगंजमधून किशोर शिंदे, गोडोलीतून शेखर मोरे, बुधवार नाका परिसरातून बाळासाहेब बाबर आणि त्यांची कन्या प्रिती बाबर ही बाप लेकीची जोडी मनसेच्या माध्यमातून रिंगणात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात फलटण, कराड, सातारा आणि महाबळेश्वर या चार नगरपालिकांमध्ये राजकीय समिकरणांचे जबरदस्त धुमशान रंगणार आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या सातारा शहरात नगर विकास आघाडी व सातारा विकास आघाडी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे वादळ 11 तारखेपासून घुमन्यास सुरुवात होणार आहे. यंदाची निवडणूक म्हणजे विद्यमानांना सुट्टी आणि माजी नगरसेवकांना आमंत्रण अशा पध्दतीची ठरली आहे. यामध्ये वसंत लेवे, जनार्दन जगदाळे, वैशाली महामुनी, शैलजा किर्दत, नासीर शेख, अल्लाउदीन शेख, मुरलीधर भोसले आणि स्नेहा नलवडे या माजी नगरसेवकांना दोन्ही आघाड्यांनी सातार्याच्या आखाड्यात आणले आहे. सार्यांचाच अनुभव दांडगा आहे. मात्र सत्ता समीकरणाचे आकडे कसे पडणार आणि जनता जनार्दन कसे प्रसन्न होणार याचे प्रत्यक्ष दर्शन 11 तारखेनंतरच पहावयास मिळणार आहे.
खरी चुरस नगराध्यक्षपदांच्या उमेदवारात
सातारा पालिकेसाठी तब्बल 13 जनांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे. नगर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांचा जोरकस प्रचार सुरु झाला असून त्यांच्या पदयात्रांचे स्वत्रंत नियोजन झाले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागणार आहे. विधानसभेच्या निवडणूकीनंतर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजे यांनी माझे हात दगडाखाली होते आता दगड माझ्या हातात आला आहे. या सूचक वक्तव्याची वारंवार आठवण सोशल कम्युनिटीवरुन करुन देवून विरोधकांनी बाबाराजे गटाची कोंडी करायचा प्रयत्न चालवला आहे. उदयनराजेंनी सातार्याला 40-0 चे स्वप्न दाखवले आहे. म्हणून आघाड्यांचे राजकारण आता टप्प्याटप्याने रंगत जाणार आहे. (दै. ग्रामोद्धार)
बिन विरोधची मिजास आता नाही…
RELATED ARTICLES