राष्ट्रवादीत खळबळ, मानकुमरेची पोलीस संरक्षणाची मागणी
मेढा : जावळीचे राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार वसंतराव मानकुमरे यांना मारहाण करण्यासाठी आज अकराच्या दरम्यान, मेढ्यात सातारहून असंख्य कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, मात्र पोलिसांना खबर लागल्याने मानकुमरे वाचले दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे ते कार्यकर्ते होते असा आरोप मानकुमरे यांनी केला असून माझ्या जीवाला खा. उदयनराजे यांच्याकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद मतदानादिवशी खा. उदयनराजे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर मानकुमरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दगडफेक करून गाडया फोडल्या होत्या त्याचा वचपा काढण्यासाठीच आज खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडून मानकुमरे यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
आज मानकुमरे पॉईंट वर जावलीचे सभापती, उपसभापती ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत सुरु होती. त्यावेळी सातारहून मानकुमरे यांना मारण्यासाठी चार पाच गाड्यातून खा. उदयनराजे यांचे कार्यकर्ते निघाल्याची खबर मिळाली त्यामुळे तिथे खळबळ निर्माण झाली लगेचच आ शिवेंद्रसिंहराजे यांनी स. पो. नि. देविदास कठाळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली.
सपोनि कठाळे यांनी तातडीने कार्यवाही करत त्या गाड्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांना ते कार्यकर्ते मिळून आले त्यावर त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा सातारला रवाना केले असे समजते मात्र पोलिसांकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही आणि पोलीस याबाबत अधिक माहिती देण्यास तयार नाहीत.
दरम्यान, मानकुमरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी सातारहून कार्यकर्ते आल्याची बातमी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर मेढ्यात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. स्वत: मानकुमरे यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली व माझ्या जीविताला खा. उदयनराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यापासून धोका असल्याचे सांगितले तसेच त्यांनी पोलीस सरक्षणाचीही मागणी केली.