पाटण : पाटण पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सणबूर गणातील उज्ज्वला जाधव यांची तर उपसभापतीपदी शिरळ गणातील ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ शेलार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभापती व उपसभापती पदासाठी केवळ राष्ट्रवादीकडूनच दोन अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व गटविकास अधिकारी किरण गौतम यांनी काम पाहिले. दरम्यान, निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
पाटण पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी अर्ज भरण्याच्या मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापतीपदासाठी सणबूरच्या उज्ज्वला जाधव यांचा व उपसभापतीपदासाठी शिरळ गणातील राजाभाऊ शेलार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी सदस्य विलास देशमुख व रूपाली पवार, अर्बन बॅँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सुभाष पवार व माजी सदस्या शोभा कदम उपस्थित होत्या. यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी देसाई गटाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सभापती व उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी घोषित केले.
सभापती व उपसभापती निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाटण पंचायत समितीच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. ढेबेवाडी विभागाला पंचायत समितीच्या सभापतीपदाचा सलग तिसर्यांदा मान मिळाला आहे. वनिता कारंडे यांच्यानंतर संगीता गुरव व आता सणबूरच्या उज्ज्वला जाधव यांची सभापतीपदी वर्णी लागल्याने ढेबेवाडीसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सभापतीपदी उज्ज्वला जाधव यांची व उपसभापतीपदी राजाभाऊ शेलार यांची निवड झाल्याचे समजताच सणबूर व कोयना विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
निवडीनंतर नूतन सभापतींना सभापती दालनात विद्यमान सभापती संगीता गुरव यांनी कारभाराची सुत्रे दिली. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नूतन पदाधिकारी व नूतन सदस्यांचे सभापती दालनात अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी, माजी सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर नूतन पदाधिकारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिणींचे आभार मानले.