सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यातील शेतकर्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा साखर कारखान्याची उभारणी केली. सभासद, शेतकरी यांचे सहकार्य आणि संचालक मंडळाच्या नियोजनबध्द संस्थाहित जोपासणार्या कारभारामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. सभासद, शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून कारखान्याने काटकसरीचे धोरण अवलंबून कारखाना प्रगतीपथावर नेला आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या इच्छेनुसार सभासद, शेतकर्यांचे जीवनमान उंचावत ठेवण्यासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना नेहमी कटीबध्द राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कारखान्याच्या 2016- 17 या 33 व्या गळीत हंगामाची सांगता या हंगामातील अंतीम 11 साखर पोत्यांचे पूजन करुन झाली. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचा यंदाचाही हंगाम सभासद, शेतकरी आणि कारखान्याचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला असून या गळीत हंगामात 110 दिवसांत 4,10,068.042 मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.83 टक्के साखर उतार्याने 4 लाख 86 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. हंगामात सरासरी 149.68 टक्के क्षमतेचा वापर होवून प्रतिदिन 3779.43 मे. टन या सरासरीने ऊसाचे गाळप करण्यात आले. सरासरी 79.59 मे.टन हेक्टरी टनेज सुध्दा निघाले आहे. कारखान्याकडून वेळोवेळी राबवण्यात येणार्या शेतकरीहितच्या योजनांचा लाभ सभासद, शेतकर्यांना होत आहे. साखर बाजारातील तेजी- मंदी विचारात घेवून मागील शिल्लक व चालू गळीत हंगामातील उत्पादित साखरेची विक्री करण्यात येत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या एफआरपी सुत्रानुसार कारखान्याने या गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतीटन 2429 आणि उत्तेजनार्थ मोबदला म्हणून 221 रुपये असा एकूण 2650 दर दिला असून प्रतिटनानुसार दि. 15 फेब्रुवारी 2017 अखेरचे संपुर्ण पेमेंट वेळेत अदा केले असून याशिवाय दि. 16 ते 28 फेब्रुवारी या शेवटच्या पंधरवड्याचे पेमेंटही वेळेत अदा करण्यात येत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
गत कालावधीध्ये कारखान्यास आलेल्या अनेक अडचणींवर मात करुन कारखान्यास उर्जीतावस्थेत नेण्यास कारखान्याच्या कामगारांनी मोलाची भुमीका बजावली आहे. त्यामुळे कामगार- कर्मचार्यांना भरभरुन दिले पाहिजे, यासाठीही संचालक मंडळ नेहमी कटीबध्द राहिले आहे. गत दिपावली सणाला कामागारांना 20 टक्के एकरकमी बोनस देण्यात आला. तसेच शासनाच्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2017 पासून कामगारांना 15 टक्के वेतनवाढही देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वच दृष्टीने आपल्या कारखान्याचे कामकाज उल्लेखनिय आणि आदर्शवत असल्याचे सर्वश्रुत आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीनुसार कारखान्याचे कामकाज अखंडपणे सुरु राहणार असून सभासद, शेतकरी, कामगार, ऊस वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, सर्वांच्या सहकार्याने कारखान्याच्या प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवू, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला.
संजीव देसाई यांनी प्रास्ताविक केले. विश्वास शेडगे यांनी स्वागत केले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास अजिंक्य उद्योग समुहाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, युनियनचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजी कदम, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहवीज प्रकल्प स्वमालकीचा होणार
या हंगामात डिस्टलरी आणि इएनॉल प्रकल्प यशस्वीपणे चालला असून सहवीज निर्मीती प्रकल्पामध्ये 4 कोटी 14 लाख 70 हजार युनीटस वीज उत्पादन करुन 2 कोटी 71 लाख 40 हजार युनीटस वीज निर्यात करण्यात आली असून यासाठी 99.30 टक्के क्षमता वापर झाला आहे. कारखान्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी येणुका शुगर्स यांच्या संमतीने सहवीज निर्मीती प्रकल्प कारखान्याकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया अंतीम टप्प्यात आली असून लवकरच हा प्रकल्प कारखान्याच्या स्वमालकीचा होणार आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने या प्रक्रीयेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यामुळे संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असून या मुल्यवर्धीत उत्पन्नातून सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊसाचा जादा मोबदला देणे शक्य होणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.