सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे अद्यापही रिमझिम पाऊस सुरू असून, पावसाने दीड महिन्यातच वर्षाची एकूण सरासरी ओलांडत 232 मि.मी.चा उच्चांक गाठला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दुष्काळी माण, खटाव तसेच फलटण तालुक्यात झालेल्या पावसाने बॅकलॉग भरून काढला. पावसाचा जोर कायम असल्याने अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यांतील खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 139.3 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 12.7 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 18.3 (803.5) मि. मी., जावली-29.4 (1401.7) मि.मी. पाटण- 21.2 (1272.3) मि.मी., कराड- 2.6 (569.1) मि.मी., कोरेगाव-3.6 (415.5) मि.मी., खटाव-0.9 (364.5) मि.मी., माण-0.0 (243.4) मि.मी., फलटण-0 (203.1) मि.मी., खंडाळा- 0.0 (392.2) मि.मी., वाई- 4.9 (638.4) मि.मी., महाबळेश्वर- 58.4 (4192.8) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 10496.5 मि.मी. तर सरासरी 954.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याला अलीकडच्या काळात दुष्काळाच्या झळांनी हैराण केले. गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने जमिनीची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली होती. तलाव, तळी कोरडे पडले होते. मोठ्या धरणांनी तळ गाठला होता. अनेक ठिकाणी पाणी कपात करावी लागली. परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून सातारा पालिकेनेही कधी नव्हे तो एक दिवसांचा शटडाऊन घेण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यात कमालीचे पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले. मे महिन्यात दुष्काळी भागातच वळीव पाऊस मोठ्या प्रमाणावर झाले. सगळ्यांचेच डोळे मान्सूनकडे लागले होते. हवामानातील बदल आणि एल निनोचा प्रभाव यामुळे मान्सूनचा अनियमितपणा वाढत चालला. त्यातच हवामान खात्याचे पावसासंबंधीचे अंदाजही वेळोवेळी चुकत आल्याने लोकांमधून चिंता वाढत होती. अशावेळी मान्सूनचे आगमन जूनच्या 1 तारखेला होईल ही अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे शेतकरीवर्गात धास्ती अधिक वाढली. मात्र, त्यानंतर दीड महिन्यांत पावसाने जोर धरला आणि या कालावधीत पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला. हवामान खात्याचा अंदाज अखेर खरा ठरला.
जुलै-ऑगस्ट महिन्यांत झालेल्या पावसाने सरासरी ओलांडली. जिल्ह्यात 133.4 टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी ऑगस्ट महिना अखेरपर्यंत 526 मिमी पावसाची नोंद झाली होती. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पडणार्या पावसाची आकडेवारी पूर्वीच निश्चित केली आहे. त्या आकडेवारीनुसार त्या तालुक्यात पडणार्या पावसाच्या आकडेवारीची सरासरी अंतिम मानली जाते. यावरुन यावर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तर गेल्यावर्षीपेक्षा जादा पाऊस झाल्याचे स्पष्ट होते. हवामान खात्याने निश्चित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत 693.7 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना आजअखेर 925.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वर्षभरात पडणारा पाऊस साधारण गेल्या दीड महिन्यांतच पडल्याने उर्वरित सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यांत पडणारा पाऊस अतिरिक्त ठरणार आहे. पावसाचे प्रमाण तालुक्यांमध्ये कमी-अधिक आहे. कमी पाऊस पडणार्या माण, खटाव तसेच फलटण या दुष्काळी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुक्यांचा बॅकलॉग पावसाने भरुन काढला. मात्र, पाऊसकाळ चांगल्या असणार्या तालुक्यांची सरासरी मात्र कमी आली यावेळच्या मान्सूनचे विशेष आहे. मान्सूनने जिल्ह्याचा संपूर्ण भाग व्यापून टाकला आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी परतीच्या पावसाने कृपा केली तर त्याठिकाणची सरासरीही भरुन निघण्यास मदत होईल. या पावसामुळे रब्बी हंगामासाठी समाधानाचे वातावरण असले तरी अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी खरीप वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. पूरपरिस्थितीत नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाकडून करण्यात आले आहे.
अद्यापही रिमझिम सुरू, पावसाने सरासरी ओलांडली
RELATED ARTICLES