महिलेचे विनयभंग प्रकरण भोवले
सातारा : फलटण नगर पालिकेतील महिला प्रकल्प अधिकार्याचा विनयभंग केल्या प्रकरणी फलटणचे विद्यमान उपनगराध्यक्ष पांडुरंग मानसिंग गुंजवटे वय 57 याला जिल्हा न्यायालयातील तिसरे अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायाधिश एन.के. चव्हाण यांनी तीन वर्ष सक्त मजूरी व पाच हजार रूपये दंड व दंड न दिल्यास आणखी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व पाचशे रूपये दंड, दंड न दिल्यास पंधरा दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे फलटण शहरात खळबळ माजली आहे.
या खटल्याचे सविस्तर वृत्त असे की, पिडीत 38 वर्षीय महिला फलटण नगर पालिकेत प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होती. दि. 5 मार्च 14 रोजी दुपारी आरोपी पांडुरंग गुंजवटे सध्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व विद्यमान उपनगराध्यक्ष हे त्यावेळी नगर सेवक होते. आरोपी गुंजवटे याने फलटण नगरपालिकेत जाऊन पिडीत महिला अधिकार्याला तु माझे काम कर, असे म्हणत वाद घातला, शिवीगाळ, दमदाटी करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. पिडीत महिलेने याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली. फलटणचे डीवायएसपी राहुल माकनिकर यांनी तपास करीत आरोपी गुंजवटे याला जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपी गुंजवटे याला न्यायालयाने तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास आणखी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले.