सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातार्यात, सातारा जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन दि. 3 आक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मराठा समाजातील महिला भगीनींसह, प्रत्येक व्यक्तीने उत्स्फूर्तपणे परंतु मराठा मोर्चा समन्वय समितीने घालुन दिलेल्या आचारसंहितेनुसार सहभागी व्हावे आणि सातारा जिल्ह्याचा मराठा क्रांती मोर्चा अभूतपूर्व होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी समस्त समाजाला केले आहे.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद करण्यात आले आहे की, मराठयांच्या मनातील असंतोष ठिकठिकाणच्या मोर्चांमधून उभ्या महाराष्ट्रात प्रकट होत आहे. मराठा समाजावर एकंदरीत होणार्या अन्यायाबाबत आज कधी नव्हे ते मराठा समाज एकवटला आहे हे निश्चितच प्रगतीचे लक्षण आहे. ऐतिहासिक काळापासून सातारच्या भूमीतुनच संपूर्ण देशाला नवविचारांची देणगी देण्याचे कार्य वेळोवेळी केले गेले आहे. सातारा ही मराठ्यांची राजधानी होती आणि आहेच तथापि सातारा क्रांतिसिंह नाना पाटीलांच्या पत्री सरकारची भुमी आहे. तसेच संत-महंताची भूमी म्हणूनही साता-याची विशेष ओळख आहे.
याच मराठा साम्राज्याच्या पवित्र भूमीत 3 आक्टोंबर रोजी निघणारा सकल मराठा समाजाचा मोर्चा, सरकारच्या उरामध्ये धडकी भरवणारा ठरण्यासाठी, सर्व मराठा समाज बांधवांनी आणि भगिनींनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सामिल होऊन, मराठ्यांच्या मूक परंतु संघटीत शक्तीचे अतिविराट दर्शन महाराष्ट्राला व देशाला घडवावे, असेही राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.