Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला जलसंपदा...

कोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला जलसंपदा मंत्री यांचा ग्रीनसिग्नल

सातारा : महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी राज्यातील धरणांच्या जलाशयात बोटींग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाटण तालुक्यातील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील बोटींग सुरु करणेकरीता गृहविभागाने सुचित केलेप्रमाणे त्यांचे विभागाकडील अहवालानंतर कोयना धरणापासून 7 किमी अंतरावर लवकरच परवानगी देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले असून जलसंपदामंत्री यांचे आश्वासना मुळे पाटणचे आ. शंभूराज देसाई यांचे प्रस्तावाला ग्रीनसिग्नल मिळाला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बुधवारी कोयनानगर येथे सहकुटुंब आले होते. यावेळी पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने पाटण तालुक्याच्या दौर्‍यावर पहिल्यांदाच आलेले मंत्री महाजन यांचे आमदार शंभूराज देसाई यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता टी.एन.मुंडे,सातारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजयराव घोगरे, कोयना बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,अभय काटकर, संजय बोडके,शिवसेना नेते जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, विभागप्रमुख किसनराव कदम, माजी सरंपच शैलेंद्र शेलार आदींची उपस्थिती होती.
मंत्री महाजन यांची भेट घेताना आ. शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणातील बोटींग सुरु करणेसंदर्भातील विषय मंत्री महाजन यांचेपुढे मांडला. यावेळी आ. शंभूराज देसाई म्हणाले,पर्यटनवाढीसाठी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये बोटींग करण्यास काहीही हरकत नाही पंरतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून सदरचे बोटींग हे कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटरपासून पुढे करावे असे जाहीर केल्याने कोयना जलाशयातील बोटींग बंद करण्यात आले होते.
यासंदर्भात मागील वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर हे पाटण दौ-यावर आलेनंतर आम्ही कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटरपासून बोटींगचे ठिकाण निश्चीत करण्याकरीता याठिकाणची हवाई पहाणी तसेच प्रत्यक्ष पहाणीदेखील केली होती.कोयना धरणाच्या भिंतीपासून सुमारे 7 किमी अंतरावर बोटींग ठिकाण विकसीत करुन बोंटीग सुरु करणेकरीता परवानगी देणेसंदर्भात गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनीही हिरवा कंदील दिला असून त्यांचे सुचनेवरुन सातारा पोलीस विभागामार्फत सदरचा अहवाल शासनाच्या गृहविभागाकडे सादर करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाचा नकाशाही यावेळी मंत्री महाजन यांना दाखविण्यात आला.जलसंपदा विभागानेही लवकरात लवकर यास परवानगी दयावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री यांचेकडे केल्यानंतर गृहविभागाने सुचित केलेप्रमाणे लवकरच यास मान्यता देण्यात येईल असे मंत्री महाजन यांनी सांगितले.त्यांनंतर आ. शंभूराज देसाईंनी कोयना नदीकाठच्या एकूण 10 पुरसंरक्षक भिंतीपैकी 7 पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना शासनाने मान्यता दिली आहे उर्वरीत सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन प्रस्तावांना मान्यता मिळाली नसल्याची बाबही मंत्री महाजन यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर लवकरच यासही मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी या दोन निर्णयासंदर्भात मंत्री महाजन यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, कोयना प्रकल्प हा महाराष्ट्र राज्याचा फायदेशीर प्रकल्प आहे.या प्रकल्पातून दरवर्षी 1700 कोटी रुपयांची वीज तयार केली जात असल्याने कोयना धरणाच्या डाव्या पायथ्याजवळ 80 मेगावॅट क्षमतेचा बंद पडलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
कोयना प्रकल्पाच्या 400 मेगावॅट क्षमतेच्या सहाव्या टप्प्याच्या कामासाठी अन्वेषण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या टप्प्याचे काम लवकरच सुरु होईल असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular