(छाया ; प्रमोद इंगळे)
सातारा : ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुता-यांचा रोमांच उभा करणारा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. आज पहाटे पासूनच या मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिव प्रेमी लोकांनी हा परिसर भारुन गेला होता.
आज सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सांगली जिल्ह्याचे आयकर विभागाचे सहायक आयुक्त पुर्णेश गुरुरानी तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणार्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुतार्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अविनाश शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपूरे, तहसिलदार रमेश शेंडगे, महाबळेश्वरच्या गटविकास अधिकारी दिलीप शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुतार्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी मक्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज…., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर शाहीर संभाजी जाधव आणि सहकार्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.
छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुर्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली.
या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.