भाजपच्या 34 उमेदवारांचे जंगी शक्ती प्रदर्शन
विकासाच्या प्रश्नांचा जाहीरनामा प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते
सातारा : सातारा शहराच्या सत्ताकारणामध्ये नेहमीच परिवर्तनाची हाक देताना साक्षीदार ठरलेले ऐतिहासिक गांधी मैदान मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभेसाठी सज्ज झाले आहे. शतप्रतिशत भाजप आणि नगराध्यक्षही भाजपचाच अशी रणगर्जना करत जिल्ह्याचे भाजप केडर पालिकेच्या आखाड्यात उतरले असून 34 उमेदवारांची येत्या आठवडाभरात खरी अग्नीपरीक्षा आहे. या उमेदवारांना मुख्यमंत्री आपल्या भाषणातून कोणती रसद देणार याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री झाल्यानंतर सातार्यात पहिलीच सभा असून परिवर्तन घडवा असाच संदेश त्यांच्याकडून दिला जाण्याची दाट शक्यता आहे.
मंगळवारी दुपारी 3 वाजता थेट गांधी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होणार असून प्रत्यक्ष जाहीर सभेला 3.30 वाजता सुरुवात होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, अमीत कुलकर्णी, रवी पवार, महिला आघाडीच्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील, दीपक पवार आदी मंडळींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनीही गृहखात्याचे मुख्य देवेंद्र फडणवीस असल्याने गांधी मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून तयारीच्या पूर्वसंध्येला या बंदोबस्ताची त्यांनी पाहणी केली. गांधी मैदानावरच्या सभेत देवेंद्र फडणवीस आमदार व खासदार गटाच्या दोन्ही स्वतंत्र आघाड्यांचा कसा समाचार घेणार याची सार्यांनाच उत्सुकता आहे. सातार्याची हद्दवाढ नंतर जिल्ह्यातील आठ नगरपालिकांना वितरीत करण्यात आलेला 17 कोटी रुपयांचा निधी हे निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी राजकीय धोरणीपणाच जास्त दाखवला होता. पश्चिम महाराष्ट्रात सातारा नगरपालिका ही अ वर्ग नगरपालिका व मराठा साम्राज्याची राजधानी असे ऐतिहासिक वलय असल्याने राजकीयदृष्ट्याही तितकीच संवेदनशील आहे. त्यामुळे सातारा व कराड व खंडाळा या तीन ठिकाणी भाजपच्या हायकमांडने राजकीय दृष्ट्या लक्ष केंद्रीत केले होते. लोणंद नगरपंचायतीमध्ये भाजपने चंचू प्रवेश केला असून खंडाळ्यातही 13 ठिकाणी भाजपने पॅनेल टाकले आहे. सातार्यात 34 उमेदवार पक्ष चिन्हावर लढत असून कराडमध्येही भाजप अपवाद वगळता स्वबळावर सत्तेत येण्यासाठी राजकीय आखाड्यात सज्ज झाला आहे. या तयारीचे सारे फिडबॅक महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून सातार्याच्या प्रलंबित मेडिकल कॉलेज संदर्भात हालचाली काय होणार कदाचित आचारसंहिता लक्षात घेऊन थेट भाष्य होणार नाही. पण खाजगीत सूचना मात्र नक्कीच जाणार त्याचे सूतोवाच आधीच करण्यात आले आहे. सातार्यानंतर कराड आणि नंतर इचलकरंजी अशा मुख्यमंत्र्याच्या सलग तीन सभा आहेत. गांधी मैदानची सभा म्हणजे निर्णायक बदल आणि विजयाचा गुलाल असे समीकरण आहे. त्यामुळे भाजपाला गांधी मैदान किती पावणार? याचे उत्तर येत्या 28 तारखेला मिळणार आहे.