सातारा ः पंचम ग्रुपचा दहावा वर्षातील सांगतेचा कार्यक्रम दि. 20 रोजी शाहु कला मंदिर येथे संपन्न झाला. कलाकार होत्या आजच्या आघाडीच्या तरूण गायिका सौ. सावनी शेंडे-साठये. सावनी शेंडे यांना घरातुनच समृध्द गायकीचा वारसा लाभला. आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांचे कडुन लहान वयातच त्यांची शास्त्रीय गायनाची तालीम सुरू झाली. पुढे त्यांना सुप्रसिध्द गायिका वीणा सहस्त्रबुध्दे यांचेकडून गायनाची प्रदिर्घ तालीम मिळाली. अशा सांगीतीक पार्श्वभूमी मुळे रसिकांच्या मध्ये कार्यक्रमापूर्वीच विशेष उत्सुकता होती.
सावनी शेंडे यांनी आपल्या गायनाची सुरूवात सर्वपरिचित अशा राग पुरिया धनाश्री ने केली. यामध्ये बडा ख्याल विलंबीत एकताल व मध्यलयीमध्ये बंदिश तिनताला मध्ये होती. पुढे आडाचौताला मध्ये एक तराना हि गायला. पारंपारिक पध्दतीने ख्यालाची सुंदर आलापी, बोल आलाप आणि दणेदार ताना अशा राग संगीतातील सर्व घटकांचा सुयोग्य मेळ साधत केली. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांनी लोकप्रिय केलेली रागमाला सादर केली. यामध्ये काही रागांमध्ये सावनी यांनी संक्षिप्त आलापी ही केली. पुढे सोहनी रागामध्ये एक बंदिश गावून मध्यांतर केले.
मध्यंतरानंतर सावनी शेंडे यांनी सहसा गायला न जाणारा वाचस्पती ह्या रागामध्ये रूपक तालामध्ये ख्याल व एक बंदिश तिनतालामध्ये मोजक्याच वेळात रंगतदारपणे सादर केली. पुढे शोभा गुर्टु यांचा एक दादरा अत्यंत बहारदापणे रंगवीला. नंतर विदुषी किशोरी अमोणकर यांनी अजरामर केलेला अभंग अवघा रंग एक झाला गावून मैफलीची सांगता भक्तिरसपुर्ण वातावरणात केली.
सावनी शेंडे यांची मैफल पारंपारीक शास्त्रीय संगीताची एक आदर्श नमुना होती. या मध्ये रसिकांकडून हमखास टाळया मिळवण्यासाठी कोणतेही चमत्कृती केली नाही. त्यामुळे मैफीलीची पातळी अत्यंत दर्जेदार राहिली.
अशा रंगलेल्या मैफलीला संवादिनीवर श्री. उदय कुलकर्णी आणि तबल्यावर श्री. अरूण गवई यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार रानडे यांनी केले व कलाकारांचा सत्कार पंचमच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. संगीता कोल्हापूरे यांनी केला. या कार्यक्रमाबरोबरच पंचम ग्रुपच्या पुढील वर्षाची नोंदणी सुरू झाली आहे.