सातारा : वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी पुणे येथून आलेल्या लक्झरी बसने शनिवारी दुपारी 3 वाजता पोवई नाका येथे दुचाकीवरील अपंगाच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या घटनेनंतर पोवई नाका येथे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. यावेळी लक्झरी बसमधून खाली उतरुन दोन तरुणांनी पोलीस व नागरिकांशी हुज्जत घातली. दरम्यान त्या दोन तरुणाविरोधात शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी लक्झरी बसमधून मुले, मुली येत होती. शनिवारी लक्झरी बस पोवई नाका येथे आल्यानंतर या बसने दुचाकीवरुन चाललेला अपंग जि. प. मध्ये लिपीक पदावर काम करणारे ननावरे रा. संगमनगर, ता. सातारा यांच्या गाडीला जोराची धडक दिली. अपघातात ते किरकोळ जखमी झाले त्याच्या गाडीचे नुकसान झाले. दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळावर जमाव जमला. या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जाधव व पवार यांनी लक्झरी बसच्या चालकास फैलावर घेतले. यावेळी बसमधील दोन तरुणांनी खाली उतरुन अरेरावी केली. अखेर सीआरपीच्या गाडीला पाचारण करण्यात आले. यानंतर सर्वांची रवानगी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जाधव व पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयीत तैसुब महमंद आतार रा. इस्लामपूर, जि. अहमदनगर व राहुल बाळकृष्ण आवटे रा. दरेगाव, जि. अहमदनगर यांच्या विरुध्द शांततेचा भंग केला तसेच सरकारी कामात अडथळा केला म्हणून भादवि कलम 110 व 117 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात दोन तरुणांना रविवारी हजर केले जाणार आहे.
(छायाचित्र : प्रकाश वायदंडे)