सातारा : सातारा जिल्ह्यात महामार्गावर अडवून लुटणार्या टोळीला अर्ध्या तासात पोलीसांनी जेरबंद केले. गणेश श्रीराम मळकुटे वय 35 रा. संभाजीनगर पुणे, संदीप सर्जेराव जाधव वय 23 रा. शेवगाव जि.अहमदनगर, शरद भाऊसाहेब भताणे वय 32 रा. वारजे पुणे व अमोल भास्कर येलार वय 19 रा. वारजे पुणे असे अटक केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मध्यरात्री दिडच्या सुमारास खंडाळा गावच्या हद्दीत पुणे-कोल्हापूर जात असलेल्या दुधाचा ट्रक बंद पडला यावेळी ट्रक चालक तानाजी रामचंद्र फराकटे वय 38 रा. बोरवडे ता. कागल जि. कोल्हापूर यांनी हायवेवरील मयुरराज हॉटेलजवळ गाडी लावून झोपी गेले. त्यावेळेस अज्ञात इसमाने त्यांना उठवून गाडीत जॅक आहे का असे विचारले त्यावेळी चालकाने जॅक नाही असे सांगितले. त्यावेळी संशयित इसमाने बघु असे म्हणून ट्रकचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तसेच दुसरा दरवाजा उघडून आणखी एका संशयिताने आत प्रवेश केला. त्यावेळी दोघांनी चालकास चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील 13 हजार 400 रू. जबरीने चोरून घेतले. त्यावेळी त्यांनी पांढरी रंगाची इंडिगो क्र. एमएच 12 डीटी 9262 मधून सातारा बाजुकडे पळून गेले. यावेळी ट्रक चालकाने गाडीचा नंबर बघुन तेथील शेजारी असणार्या हॉटेल मालकांना हाका मारून उठविले. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवरून 100 नंबरवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कंट्रोलरूमने तात्काळ या घटनेची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना दिली. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात नाका बंदीचे आदेश दिले. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विश्वास देशमुख व चालक संजय धुमाळ पेट्रोलींग करीत असताना संबंधित नंबरची गाडी त्यांना सातारा बाजुकडे दिसली. यावेळी त्या दोघांनी गाडीचा पाठलाग करून गाडी आडवी मारून इंडिगो कार थांबविली. तेथून पोलीसांनी तात्काळ गाडीच्या चाव्या काढून त्या संशयितांना गाडीतच लॉक करून टाकले. यावेळी खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी फिर्यादी ट्रक चालक फराकटे यांना घेऊन संबंधित गाडी जवळ येवून संशयितांना दाखविले असता चालकाने ओळखले. पोलीसांनी संशयित गणेश मळकुटे, संदीप जाधव, शरद भदाणे, अमोल येलार यांना ताब्यात घेतले. या चार आरोपींनी जिल्ह्यात तसेच परजिल्ह्यात अशाच प्रकारे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस घेत आहेत. वरील संशयितांना न्यायालयात हजर केले असता 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. घटना घडल्यानंतर अर्ध्या तासातच आरोपी जेरबंद केल्या प्रकरणी पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी भुईंज पोलीस ठाण्यातील रात्रगस्त करणार्या विश्वास देशमुख व संजय धुमाळ यांचे विशेष अभिनंदन केले.