एकंबे : सातारारोडपासून अवघ्या पाच कि. मी. अंतरावर असलेल्या खडखडवाडी येथील कृष्णा शिवराम चव्हाण यांची गट नं. 117 मधील 1 हेक्टर 62 आर जमीन ही खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे वारस नोंदी करुन फसवणूक केल्याप्रकरणी किन्हईचे तत्कालीन मंडलाधिकारी, खडखडवाडीचे तत्कालीन गाव कामगार तलाठी यांच्यासह रामचंद्र कृष्णा साळुंखे, विष्णू लक्ष्मण साळुंखे व मोहन लक्ष्मण साळुंखे यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी या जमिनीचे कृष्णा शिवराम चव्हाण यांच्या वारसांच्यावतीने मुखत्यार अमोल आवळे यांनी गुरुवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की खडखडवाडी येथे कृष्णा शिवराम चव्हाण यांची गट नं. 117 मधील 1 हेक्टर 62 आर जमीन असून, ते व्यवसायाच्या निमित्ताने खंडाळा, जि. सातारा येथे स्थायिक झाले होते. त्यांचा दि. 9 नोव्हेंबर 1980 रोजी महू-दापवडी, ता. जावली येथे मृत्यु झाला होता. त्यांनी आपल्या हयातीत जमिनीची विल्हेवाट लावली नव्हती.
त्यांच्या वारसांपैकी नातू बाळू श्रीपती चव्हाण यांना या जमिनीबाबत तबदिली झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी संबंधित जमिनीची कागदपत्रे गोळा करण्यास सुरु केली असता, त्यामध्ये त्यांना सदरची जमीन मृत कृष्णा चव्हाण यांनी लक्ष्मण आण्णा साळुंखे व कृष्णा आण्णा साळुंखे यांना मृत्यु पत्राने दिल्याची नोंद आढळून आली. या जमिनीवर विष्णू लक्ष्मण साळुंखे व मोहन लक्ष्मण साळुंखे यांनी कर्ज देखील काढले असल्याचे दिसून आले.
या जमिनीला लक्ष्मण आण्णा साळुंखे व मृत कृष्णा आण्णा साळुंखे यांचे वारस रामचंद्र कृष्णा साळुंखे, विष्णू लक्ष्मण साळुंखे यांनी स्वत:ची नावे नोंद करुन घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कृष्णा साळुंखे यांचा मृत्युचा दाखला मु. पो. कर्जी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील सादर केलेला होता. त्यावर रजिष्टर नंबर नसल्याचे दिसून आल्याने त्याची खातरजमा केली असता, तो बनावट असल्याचे ग्रामसेवक व खेडच्या गटविकास अधिकार्यांनी कळविले. किन्हईचे तत्कालीन मंडलाधिकारी, तत्कालीन गावकामगार तलाठी यांनी बनावट पंचनामे केले. मृत्युपत्राबाबत आवश्यक असलेली न्यायालयीन प्रोबेट प्रक्रिया पूर्ण केली नाही. खोटे मृत्युपत्र, खोटा व बनावट मृत्युचे दाखले तयार करुन त्याचा वापर जमिनीच्या नोंदीसाठी केले असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आवळे यांनी याप्रकरणी कोरेगावचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज सादर केले होते.
याप्रकरणी चव्हाण यांच्यावतीने मुखत्यार अमोल आवळे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी किन्हईचे तत्कालीन मंडलाधिकारी, तत्कालीन गाव कामगार तलाठी यांच्यासह रामचंद्र कृष्णा साळुंखे, विष्णू लक्ष्मण साळुंखे व मोहन लक्ष्मण साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.