औंध: व्ही.पी.फ्रेंडस सर्कल या नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोशी विडंबनात्मक छेडछाड केल्याने औंध येथील कुलदीप इंगळे यांनी मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. वैभव भाऊसाहेब पवार रा.अंबवडे ता.खटाव असे ग्रुप अँडमीनचे नाव असून त्याला औंध पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की व्ही.पी.फ्रेंडस सर्कल या व्हाट्सअप ग्रुपवर गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला वेगळे चित्र लावून तो मेसेज फोटो या ग्रुपवर 91307***** या मोबाईल क्रमांकवरून मेसेज टाकण्यात आला. हा आक्षेपार्ह फोटो पाहिल्यानंतर औंध येथील कुलदीप इंगळे यांनी संबंधित व्यक्तीस दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. मात्र त्या व्यक्तीने नकार दिला. त्यानंतर कुलदीप इंगळे यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये येऊन व्ही.पी. फ्रेंडसर्कल ग्रुपमधील 91307***** या मोबाईल क्रमांकावर तसेच संबंधित ग्रुपच्या अँडमीन वर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
औंध येथे समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड व जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली निषेध फेरी काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. औंधसह परिसरात ही घटना समजताच कुलदीप इंगळे, गणेश इंगळे, प्रशांत सर्वगोड, सोमनाथ इंगळे, मंगेश इंगळे, केशव इंगळे दत्ता केंगारे, अशोक इंगळे तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते औंध येथे एकत्रित आले.
यावेळी निषेध फेरी काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच महापुरुषाची विटंबना करणार्या दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अॅडमीनला औंध पोलिसांनी अटक करून शुक्रवारी सायंकाळी उशिरा वडूज न्यायालयात हजर केले आहे. दरम्यान याघटनेमुळे औंध परिसरासह खटाव तालुक्यात खळबळ उडाली असून अनेक मोबाईल ग्रुपधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चौकट..
जनता क्रांती दलाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांनी दिली.