Wednesday, March 19, 2025
Homeकरमणूककलाकृती आणि रिकामटेकडे ...

कलाकृती आणि रिकामटेकडे (लेखक – अभय देवरे)


आरक्षण नावाचा चित्रपट होता, होय, आरक्षण या नावाचा…. आरक्षण विषयावरचा नव्हे ! पण तो चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच प्रसिद्ध झाला. कारण गावागावात मोर्चे निघाले, आरक्षणाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने. सगळ्या चॅनेल्सनी नेहमीप्रमाणे चर्चेचे दळण दळलेे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रचंड चालला. पण तो बघितल्यावर लक्षात आले की आरक्षण या विषयावर त्यात काहीच उहापोह नव्हता फक्त नाव आरक्षण होते. अर्थात तोपर्यंत निर्माता वितरकांनी बक्कळ पैसा कमावला होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो न पाहता विरोधकानी इतकी राळ उडवली की अशी प्रसिद्धी लाखो रुपये खर्च करूनही मिळाली नसती.  
बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबतही तसेच घडले. इतिहासात प्रत्यक्षात नसलेले काशीबाई आणि मस्तानी यांचे नृत्य व प्रत्यक्ष बाजीराव यांना नाचताना दाखवून निर्मात्याने इतिहासाची मोडतोड केलीच होती पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तीच नृत्ये जाहिरातीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा दाखवून चित्रपटाविरुद्ध वातावरण मुद्दाम व्यवस्थित तापवले गेले. पुन्हा तेच ते मोर्चे, मीडियावरील चर्चा, सोशल मीडियावर भांडणे घडवली गेली. आणि पुरेशी प्रसिद्धी झाल्याचे लक्षात आल्यावर चित्रपट प्रदर्शित केला गेला. अर्थातच तो सुपर डुपर हीट ठरला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात ती दोन गाणी सोडली तर बाकी चित्रपट खूप सुंदर होता. पहिल्या बाजीरावाची ओळख त्यानिमित्ताने सर्वाना झाली. नाहीतर बाजीराव म्हणजे पळपुटा बाजीराव हे समीकरणच सर्वांच्या मनात होते. 
आणि अजूनही प्रदर्शित न झालेल्या पद्मावती आणि दशक्रिया या दोन्ही चित्रपटांबद्दल तसेच घडवले जात आहे. चित्रपटाचा सेट तोडणे, धमक्या देणे अशी पुढची पाऊलेही उचलली जात आहेत.  चित्रपट निर्माते आणि वितरकाना एक भन्नाट आयडिया गवसली आहे. असा काहीतरी विषय शोधून काढायचा की लोकांमधली जातीय, धर्मीय, पंथीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांविषयीच्या अगोदरच टोकाच्या असलेल्या भावना अधिक टोकदार झाल्या पाहिजेत. लोक रस्त्यावर उतरले पाहिजेत, जाळपोळ, दगडफेक झाली पाहिजे, आपापसात मारामा-या झाल्या पाहिजेत म्हणजे चित्रपटाच्या यशस्वितेचे खात्रीच पटते. समाजाचे नुकसान झाले तर झाले पण आमचा पैसे वसूल झाला ना… बाकी पब्लिक मरु देत ही  भावना पसरू पाहतेय. 
आणि मला आठवला तो कै. गजानन जहागीरदार यांच्या आत्मचरित्रातला प्रसंग ! सातवीच्या मराठीच्या पुस्तकात धडाच होता. नाव होते, कलेचा प्रभाव. हिंदुमुस्लिम दंग्याविरोधात व्ही शांताराम यांनी पडोसी या हिंदी आणि शेजारी या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. गजानन जहागीरदार यांना मुस्लिम भूमिका तर महजरखान या अभिनेत्याला ब्राह्मणाची भूमिका दिली. दोघेही त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेले आणि भूमिकांची अदलाबदल करा म्हणून विनंती केली. तेंव्हा त्या महान कलावंताने दोघांनाही खडसावताना सांगितले,  अरे, हिंदु मुस्लिम भाऊ भाऊ आहेत असे दाखवायचे आहे ना आपल्याला. मग दुस-याचा दृष्टिकोन, दुस-याची भावना आपण स्वतः अगोदर समजावून घ्यायला नको ? तुम्हालाच जर दुस-याचा धर्म कळला नाही तर तुम्ही भूमीका मांडणार तरी कशी ? जे दुस-याला सांगायचे त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी !  पूर्वी  चित्रपट हे समाज घडवण्याचे काम करत असत.. आणि आता चित्रपट हे समाज बिघडवण्याचे काम करतात कारण पूर्वीची माणसे समाज समजून घेत असत आणि आत्ताची माणसे समाज वापरून घेतात. 
आपल्या देशात चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर करावा लागतो. त्याशिवाय तो प्रदर्शित करता येत नाही. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी जर एखादा चित्रपट पाहून त्याला परवानगी दिली असेल तर समाजातल्या स्वयंघोषित न्यायाधीशांनी चित्रपट बंद पाडण्याचे काहीही कारण नसते. किंबहुना ते त्यांना करताही येत नाही. पण समाजात रिकामटेकडे लोक पुष्कळ असतात. चित्रपटाचा मार्केटिंग विभाग या मोकळ्या बसलेल्या लोकांना कामाला लावतो. एकही पैसा खर्च न करता जर सर्वदूर प्रसिद्धी करायची असेल तर आपणच आपली बदनामी करण्याचे फंडे अवलंबिले जातात.
आजकाल प्रत्येकाच्या धार्मिक, जातीय अस्मिता फारच टोकदार झालेल्या आहेत. तसेच ऐतिहासिक व्यक्तींबाबतच्या भावनाही लगेच भडकतात. लोकांना आपण शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली, चंद्रकोरीचे भगवे गंध लावले की झालो आपण शिवाजीमहाराज असे वाटत असते. मात्र त्याचबरोबर तोंडात तंबाखूची गोळी ठेवली आहे याचे त्यांना भान नसते. गल्लोगल्ली फिरणा-या या रिकामटेकड्या प्रति शिवाजींना खाद्य पुरवण्याचे काम हा मार्केटिंग विभाग करतो. पद्मावती चित्रपट तयार करायला सुरुवात केल्यापासून आंदोलनांना सुरुवात झाली आहे. पण मला प्रश्न पडला की आंदोलन करणार्‍यापैकी एकालाही मूळ कथा माहीत आहे का ? राजपूत स्त्रियांनी आपल्या अब्रूरक्षणार्थ आणि धर्मरक्षणार्थ केलेले सर्वोच्च बलिदान आजपर्यंत तुम्हाला नाही आठवले. आजपर्यंत घरातल्या स्त्रीलातरी तुम्ही कधी मान दिला आहे का ?  तो चित्रपट येतोय म्हणजे त्यात राजपूत स्त्रीचे चुकीचे चित्रीकरण असणार हे कसे तुम्ही ठरवले ? कोणताही चित्रपट तयार होत असताना त्यात काम करणा-या कालावंतांनाही संपूर्ण संवाद किंवा कथा दाखवली जात नाहीत मग तुम्हाला ते कळले कसे ? हुशार निर्मात्याने तुम्हाला फुकटचे कामाला लावलंय हे कधी लक्षात येणार तुमच्या ?
हे आंदोलक सुद्धा दुतोंडी असतात. आपण मागच्यावेळी काय भूमिका घेतली आहे हेसुद्धा त्यांच्या लक्षात नसते. काही दिवसांनी ते सहजपणे मागच्यापेक्षा विरोधी भूमिका घेतात. घाशीराम कोतवाल या नाटकात नाना फडणवीस यांचे विपर्यास्त चित्रण आहे असे काहींचे म्हणणे होते. म्हणून त्यांनी आंदोलन केले तर काहींनी त्या आंदोलकांविरुद्ध आंदोलन केले. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा  अभिव्यक्तिस्वातंत्र्य या नावाखाली नाटकाच्या बाजूने मत दिले. मग मतामतांच्या गलबल्यात ते नाटक संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान चालले. पण तेच  अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी नथुराम गोडसे या नाटकाच्या वेळी कुठे होते ? त्या नाटकाचा सेट जाळला गेला, कलावंतांना ठार मारण्याचा धमक्या आल्या, कोणत्याही गावात या नाटकासाठी नाट्यगृह मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले. या नाटकाच्या निमित्ताने नथुरामच्या नथीतून त्याच्या जातीवर असंख्य बाण मारले गेले. भारतात बॉम्बस्फोट घडवणा-या  किंवा काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करणा-यांना धर्म नसतो पण नथुरामला मात्र जात असते हे दाहक सत्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार त्यावेळी कोणाच्याही मनात आला नाही आणि त्या नाटकाला प्रचंड विरोध झाला. परिणामी ते नाटक आजही हाऊसफुल्ल सुरू आहे. कोणी केली त्याची इतकी प्रसिद्धी ? रिकामटेकड्या समाजधुरीणांनी ! खरे तर पहिले काही प्रयोग निर्मात्याने तोट्यात केले होते. एखाद्या नाटकाचा एक प्रयोग लावायचा झाला तर किमान पन्नास हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे जर दहा प्रयोग तोट्यात गेले तर निर्माता नाटक बंद करतो. नथुरामसुद्धा बंद पडले असते जर लोक ते पाहायलाच गेले नसते. पण अतिउत्साही विरोधकांच्या हातात नथुराम गोडसे या नावाचे कोलीत कायमस्वरूपी मिळाले आहे, त्याने ते नेहमीच आग लावत सुटतात. त्यामुळे ते नाटक धो धो चालण्याचे सर्व श्रेय फक्त दुतोंडी आंदोलकांचे आहे. 
दोन वर्षांपूर्वी शिवाजी अंडरग्राऊंड अ‍ॅट भीमनगर मोहल्ला हे नाटक आले. गावोगाव त्याचे प्रयोग झाले. नथुरामला विरोध करणारे त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे होते. म्हणजे दुस-याने कोणत्याही कलाकृतीतून मला हवी ती भूमिकाच मांडली  पाहिजे पण मी मात्र कोणतीही कलाकृती स्वतःचे पैसे खर्च करून निर्माण करणार नाही. अशी अतिरेकी विचारसरणीची नवी जमात निर्माण झाली आहे. 
ही अतिरेकी जमात साहित्य क्षेत्रातही धुमाकूळ घालत आहे. एक फार मोठे साहित्यिक
एका विशिष्ठ विचारसरणीचे होते म्हणून त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहू दिले गेले नाही. त्यांच्या विरोधात जी आघाडी उघडली होती त्यात मराठीतले इतर नोठमोठे साहित्यिक आणि त्यांचे व्यक्तिगत मित्रही होते. त्यावेळीही अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा शब्द कोणाला माहीत नव्हता. व्यक्तिगत विचारसरणी वेगळी आणि साहित्यनिर्मिती वेगळी अशी भूमिका कोणीही मांडली नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यसेवेची कदर कोणीही केली नाही हे शल्य आहे. पण निदान ते साहित्यिक तसे भाग्यवान म्हंटले पाहिजेत कारण निवडणुकीच्या रिंगणात त्यांना प्रवेश करू दिला नव्हता. पण रीतसर अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून आल्यावर एका साहित्यिक महोदयांना त्या खुर्चीवर बसू दिले गेले नाही कारण कोणीतरी टिक्कोजीराव अचानक उठले आणि अध्यक्षांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका कादंबरीत म्हणे तुकाराम महाराजांची बदनामी केली होती म्हणून आंदोलन उभारले. ते इतक्या वेगात महाराष्ट्रभर पसरले की त्यांना बिचा-यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि इतिहासात पहिल्यांदा महाबळेश्वर येथील साहित्यसंमेलन अध्यक्षांविना पार पडले. त्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रात एक फारच विनोदी घटना घडली. तब्बल नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेल्या पण अर्धवट राहिलेल्या एका  नाटकात म्हणे संभाजी महाराजांची बदनामी केली म्हणून 1962 मध्ये उभारलेला लेखकाचा  पुतळा 2016 मध्ये फोडला गेला. बर ज्यांनी तो फोडला त्यांनी ते नाटक वाचलेले होते काय ? आणि बदनामी झाली हे तुम्हाला नव्वद वर्षांनी कळले ? इतकी वर्षे तुम्ही झोपला होतात काय ? 
इतिहासकालीन महापुरुषांची बदनामी हा शब्द आपण खूप स्वस्त करून टाकला आहे. अरे, शेकडो वर्षे गेली तरी ज्यांचे नाव समाजमनावर कोरलेले आहे त्यांची बदनामी इतकी सहज होऊ शकते ? त्यांचे कार्य इतके तकलादू वाटते का की कोणी काहीही प्रतिकूल मत नोंदवले की त्यांची लगेच बदनामी होते ? एखाद्या महनीय व्यक्तीची बदनामी झाल्याची आवई उठते तेंव्हा आंदोलनकार्त्यानी त्या व्यक्तीचा स्वतः किती अभ्यास केलेला असतो ? तुम्हाला राजकीय पुढारी वापरून घेत आहेत हे कसे कळत नाही ? 
होय, या सर्व घटनांच्या मागे राजकीय पुढारीच आहेत. ते या रिकामटेकड्या तरुणांना नादी लावतात आणि आपली मतांची पोळी भाजून घेतात  कोणतेही सकारात्मक कार्य ज्या नेत्यांना करता येत नाही ते असे नकारात्मक कार्य करून समाजात सतत चर्चेत राहतात. तरुणांच्या मनात दुस-याबद्दल सतत असुरक्षतेची भावना निर्माण करता आली की त्यातून मार्ग दाखवणारा मीच आहे हे त्यांच्या मनात ठसवणे सोपे जाते. तेच सध्या चालू आहे. तरुण वर्गाला बहकावणे हे खूप सोपे बनलंय. आणि तरुणही या जाळ्यात अलगद अडकताहेत हे दुर्दैवी आहे. 
सध्या गाजत असलेल्या गोव्याच्या इफ्ही महोत्सवात घडलेली घटना निषेधार्ह आहे. त्या महोत्सवासाठी निवडलेले दोन चित्रपट माहिती आणि प्रसारण खात्याने रद्द केले. त्या खात्याला तो अधिकारच नाही. पण अतिहुशार अधिका-यांनी त्या दोन चित्रपटांवर अन्याय करून विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या हातात ऐते कोलीत दिले. 
कोणतीही कलाकृती एकतर चांगली असते किंवा वाईट असते, तिसरी कोणतीही बाजू तिला नसते. ती चांगली का वाईट हे आपण व्यक्तिगत ठरवायचे असते. दुस-याचे म्हणणे जर ऐकून ठरवू लागलो तर आपण कळसूत्री बाहुल्या ठरतो आणि त्या कलाकृतीची आपोआप प्रसिद्धी करतो. आपल्यातून तशी बाहुली बनू द्यावी का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. अगोदर ते चित्रपट प्रदर्शित होऊद्यात, ते स्वतः पहा, कदाचित त्यातून चांगला संदेशही दिला गेला असेल ! पण जर विकृतीकरण केले असेल तर त्याविरुद्ध पुरावे गोळा करून स्वतः न्यायालयात जा. पण चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर दंगा करून त्याची फुकटची प्रसिद्धी नका करू.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular