Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीनिलंबित अव्वल सचिव भरत पाटील याच्या निवासस्थानातून १६ काडतुसे जप्त

निलंबित अव्वल सचिव भरत पाटील याच्या निवासस्थानातून १६ काडतुसे जप्त

पाटण :- मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अव्वल सचिव भरत आत्माराम पाटील याने तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर फरारी भरत पाटील याचा तपास पोलिस करत असताना मारूल हवेली ता. पाटण येथील त्याच्या निवासस्थानी पोलिसांना ४२ मि. मि. रिवाॅल्व्हरची १६ काडतुसे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. तर भरत पाटील अद्यापही फरार असल्याची माहिती तपास अधिकारी स. पो. नि. तृप्ती सोनवने यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी भरत पाटील यांचेसह अन्य तिघांनी दिवशी बुद्रुक येथील त्यांच्याच गावातील पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्याला रिवाॅल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भरत पाटील यांचेसह अन्य तिघे यापैकी एक अज्ञात अशा एकूण चार जणांविरूद्ध पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी यापैकी जितेंद्र सुर्यवंशी याला अटक केली त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. याच गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलालाही चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले होते. भरत पाटील व अन्य एकजण यात फरारी आहे. याबाबत मंगळवारी रात्री स. पो. नि. सौ तृप्ती सोनवने यांच्या पथकाने मारूल हवेली येथील भरत पाटील याच्या बहिणीच्या घराशेजारीच बांधलेल्या वास्तूत धाड टाकली. यात भरत पाटील सापडला नाही परंतु त्याठिकाणची तपासणी केली असता तेथे ४२ मि. मि. रिवाॅल्व्हरची १६ काडतुसे सापडून आली. त्यानंतर ही काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. भरत पाटील हा ग्रामविकास विभाग मंत्रालयात अव्वल सचिव म्हणून कार्यरत होता परंतू त्याची चौकशी सुरू असल्याने सन २०१७ / १८ पासून तो निलंबित आहे. तर दरम्यानच्या काळात यापुर्वी पाटण पोलिसात भरत पाटील याचेविरूद्ध अशा प्रकारे मारहाण, हवेत फायरिंग व गावकऱ्यांची फसवणूक आदी तक्रारी दाखल झाल्या आहेत. तथापी आजवर त्याचेवर कोणतीही गंभीर कारवाई अथवा रिवाॅल्व्हर जप्त झाली नसल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. पाटणच्या स. पो. नि. तृप्ती सोनवने याबाबतचा आता चिकाटीने तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular