एलसीबीची कारवाई 7 लाखाचा ऐवज जप्त
सातारा : जिल्ह्यात असलेल्या पवन चक्कीच्या तांब्याच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. त्या टोळीकडून 700 किलो तांब्याची तार सुमारे 7 लाख रूपये किंमतीची व दोन दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. शरद भिमराव गोडसे वय 29, विनायक उर्फ विनोद मल्हारी सकटे वय 21, कमलेश संजय यादव वय 21, अजय चव्हाण वय 19 व संदीप अशोक खरात वय 27 सर्व रा. गोळेवाडी ता. कोरेगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यात असलेल्या पवन चक्कीच्या तांब्याच्या तारेच्या चोरीचे प्रमाणे वाढले होते. त्याबाबत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्यास सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास चालू असताना दि. 30 ऑगस्ट 16 रोजी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना करंजे नाका येथे दोन मोटार सायकलवर 5 जण मोटार सायकलवरून तांब्याची तार विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून पाच संशयितांना मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पवन चक्कीच्या तांब्याची तार औंध, पुसेगाव, ठोसेघर येथून चोरी केली असल्याचे कबुल केले. पोलीसांनी त्यांच्याकडील 700 किलो तांब्याची तार व दोन दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. वरील पाच आरोपींना औंध पोलीसांच्या हवाली केले आहे. वरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत संदीप पाटील, पोलीस अधिक्षक सातारा. विजय पवार, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांचे सुचनाप्रमाणे व पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सागर गवसणे, गजानन मोरे, सहा. फौ. विलास नागे, पो.हवा. संजय पवार, ज्योतीराम बर्गे, पो.ना. मोहन नाचण, प्रविण शिंदे, पो. कॉ. नितीन भोसले, योगेश पोळ, प्रणि कडव, महेश शिंदे, रविंद्र वाघमारे, मारूती लाटणे, चालक मारूती अडागळे, विजय सावंत यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे. सदर कारवाईबाबत संदीप पाटील पोलीस अधिक्षक सातारा तसेच विजय पवार अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांनी या कारवाईत सहभाग घेतलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, पकडण्यात आलेल्या आरोपींविरोधात यापूर्वीही अपहरण व बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून आणखी चोरीचे व इतर गंभीर गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
आरोपी हे महाविद्यालयात शिक्षण घेत असून सकाळी शिक्षण व रात्री चोरी असा प्रकार उघडकीस आल्याने पोलीसही चक्राऊन गेले आहेत.