सातारा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सातारा सरकारी निम सरकारी शिक्षक संघटना समन्वयक समिती, महसूल कर्मचारी संघटना यांनी सातवा वेतन आयोग तसेच प्रलंबित मागण्यांबाबत पुकरण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सातार्यात आज सरकारी कर्मचार्यांनी जिल्हाधिकार्यांनी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक येथून सरकारी कर्मचार्यांच्या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा पोवई नाकावरुन जिल्हाधिकारी कार्यालय व पुढे जिल्हा परिषद असा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करावा, रिक्त पदे त्वरीत भरावीत, कंत्राटीकरण व नैमितीक नियुक्त रद्द करा, अस्थायी पदावरील कर्मचार्यांना स्थावी करण्यात यावे, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह त्वरीत द्यावा, शिक्षणातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, निकष पात्र शाळांना अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, महिला कर्मचार्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करावी, अथिती शिक्षक व अंशकालीन शिक्षक नेमणुकांबाबतचे शासन निर्णय रद्द करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कमचारी महासंघाचे अध्यक्ष काका पटील, सरचिटणीस उध्दव फडतरे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव मोहिते, सरचिटणीस विलास खाडे, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संगांना अध्यक्षा श्रीमती सुरेखा चव्हाण, सरचिटणीस प्रकाश घाडगे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचार्यांचा मोर्चा
सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे प्रलंबित मागण्यांबाबत आज मोर्चा काढण्यात आला. ग्रामविकास मंत्री व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेवून प्रश्न सोडवावेत, ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन सन 2016-17 वर्षाचे शासकीय अनुदान त्वरीत जि. प. कडे वर्ग करावे, ग्रामपंचायत कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वर्ग 3 व 3 नुसार वेतन श्रेणी व सेवाशर्ती लागू करावी, लोकसंख्या आकृती बंद रद्द करा किमान वेतनासाठी सर्व परिमंडळांना 100 टक्के अनुदान द्यावे, 90 टक्के करवसुलीची अट कर्मचार्यांवर न लादता वेतनासाठी 100 टक्के अनुदान द्यावे, केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कर्मचार्यांना परिमंडळ निहाय दरमहा 10 हजार, 12 हजार, 15 हजार याप्रमाणे वेतन द्यावे, मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कॉ. शामराव चिंचणे, शिवाजी इंगवले, सुनिल गुरव, महेश जाधव, प्रकाश पवार यांनी केले होते.
महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघटनेतर्फे मोर्चा
महाराष्ट्र पूर्ण प्राथमिक शिक्षिका सेविका संघ सातारा जिल्हा शाखेतर्फे प्रलंबित मागण्यांबाबत मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा, चंद्रश्वरी आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मदतनीस यांना 20 हजार रुपये पगार मिळावेत, या मोर्चाचे नेतृत्व शौकत पठाण, कॉ. शिवाजी पवार, सुजाता रणनवरे, विमल चुनाडे यांनी केले होते.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने मोर्चा
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने अंगणवाडी, सेविका, मदतनीस मागण्यांसाठी कॉ. आनंदी अवघडे, छाया पंडीत, मालन गुरव, चंद्रकांत शिंदे, मंगल फडणीस, सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.