सातारा : सातारा शहरातील 666 मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीत मुस्लिम समाजातील दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरुन बुधवारी रात्री 9.45 वाजता झालेल्या राड्यात तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी परस्पर विरोधी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप कोणासही अटक झालेली नाही. जमावाने 10 ते 12 गाड्या फोडून मोठे नुकसान केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अस्लम निजाम खटीक (वय 49, रा. 666 मंगळवारपेठ दस्तगीर कॉलनी सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री 9.45 वाजता संशयीत सलमान शेख, सलीम, बबलू, अस्लम, मुस्तफा, वाहिद, अलम शेख, समीर शेख व इतर 15 ते 20 जणांनी लाकडी दांडक्याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन माझी पत्नी व मुलांसह तिघांना बेदम मारहाण केली. तर इम्रान परवेज शेख (वय 21, रा. गुरुवार पेठ सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयीत शाहरुख, अस्लम खटीक याने लोखंडी गजाने मारहाण केली. दरम्यान, मुस्लिम समाजातील बुधवारी रात्री झालेल्या दोन गटातील राड्याप्रकरणी परस्पर विरोधी एकूण 30 जणांवर भादवि कलम 324 प्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पो. ना. लेंभे व हवालदार ससाणे करीत आहेत.