सातारा : शासनाचा रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणी नगर सेविकेच्या पतीसह तीन जणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानचे मालक व नगरसेविकेचे पती प्रमोद यशवंत तपासे रा. मल्हारपेठ सातारा माल खरेदी करणार विलास लक्ष्मण वाघोलीकर वय 67 रा. मंगळवारपेठ सातारा व गाडी चालक संदेश चंद्रकांत शिंदे वय 25 असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार सर्वसामान्य जनतेला वाटप करण्याकरिता दिलेल्या धान्याचे काळ्या बाजारात विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सांगितले होते. दरम्यान 30 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेली माहिती अशी की, टाटा कंपनीची गाडी एमएच 11 एजी 5474 मध्ये रेशनिंग दुकानातील मार्केट यार्ड परिसरात विक्रीसाठी उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. घनवट यांनी त्यांच्या पथकास सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. स्था.गु.शाखेने संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली असता मिळालेली माहितीची गाडी त्याठिकाणी आढळून आली. त्यांनी गाडीच्या चालकास ताब्यात घेऊन गाडीतील गव्हाबाबत माहिती विचारली असता त्यांनी हा गहू मल्हारपेठेतील स्वस्त धान्य दुकानातून प्रमोद तपासे यांच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. पोलीसांनी गाडीतील 13 प्लॅस्टीकची पोत्यातील सुमारे 650 किलो रेशनिंगचा गहू 10 हजार 400 रूपये किमतीचा पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी वरील संशयीतांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पो.नि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.फौ. पृथ्वीराज घोरपडे, पो. हवा. विजय शिर्के, जोतीराम बर्गे, चालक विजय सावंत यांनी सहभाग घेतला होता.