महाबळेश्वर : मधुसागरचे अध्यक्ष संजय गायकवाड यांचेसह संचालक तुळशीराम शेलार व बाबाजी मोरे या तिघांचे संचालक म्हणून असलेले सर्व अधिकार गोठविण्याचा निर्णय जिल्हा सह न्यायालयाचे न्या. सौ. एम्. ए. साळी दिल्याने महाबळेश्वर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. पालिकेतील राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवक अपात्र ठरल्याच्या काही दिवसातच राष्ट्रवादीच्या या तीन संचालकांवर अशा प्रकारे गंडांतर आल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसला तालुक्यात बसलेला हा मोठा हादरा मानला जात आहे.
राज्यातील सर्वात मोठी मधोत्पादक सह संस्था म्हणून येथील मधुसागर या सहकारी संस्थेचा नावलौकिक आहे. या संस्थेवर स्थापनेपासूनच काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहीले आहे. मार्च 2016 मध्ये या संस्थेची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती संजयबाबा गायकवाड यांच्यासह तुळशीराम शेलार व बाबाजी मोरे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी उमेदवारांना काही नियम आहेत. या मध्ये प्रामुख्याने निवडणुकीसाठी उभे राहणारे उमेदवारांने वर्षामध्ये किमान पंधरा किलो मध संस्थेकडे घातला पाहिजे, तसेच जेवढा मध तयार होईल तेवढा सर्व मधुसागर या संस्थेकडेच जमा केला पाहिजे. इतर कोठेही मधाची विक्री करता कामा नये अशा अटी आहेत. ज्यावेळी उमेदवारी अर्जांची छाननी होते तेव्हा या सर्व गोष्टींची पडताळणी निवडणुक निर्णय अधिकारी हे करीत असतात परंतु यंदाच्या निवडणुकीवेळी राजकीय दबावामुळे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी या निकषाकडे दुर्लक्ष करून या तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले होते निवडणुकीमध्ये या तीन उमेवार विजयी झाले होते. या तीन पैकी संजयबाबा गायकवाड हे मधुसागरचे अध्यक्ष झाले.
मधुसागरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या राजेश सपकाळ संजय शेलार व सखाराम शेलार यांनी या तीन उमेदवारांच्या उमेदवार वैधतेला सहकार न्यायाालयात आव्हान दिले. संजयबाबा गायकवाड यांनी पंधरा ऐवजी वर्षाला केवळ नऊ किलो मध संस्थेत घातला होता. तर तुळशीराम शेलार व बाबाजी मारे यांनी मधुसागर सह मधुकोश या संस्थेकडे मध घातला होता. अशा प्रकारे या तीनही उमेदवारांनी संस्थेच्या पोट नियमांचा भंग केल्याचे सर्व पुरावे न्यायालया समोर सादर केले न्यायालयाने याचिकाकर्ते यांच्यासह मधुसागर संस्था व तीन लोकप्रतिनिधी यांची बाजू ऐकूण घेतली उपलब्ध सर्व पुराव्यांचे अवलोकन केले व त्यांनी मधुसागरचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड तुळशीराम शेलार व बाबाजी मोरे या तीनही संचालकांचे अधिकार गोठविण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने या तीनही संचालकांना संस्थेच्या आर्थिक कारभाराचे निर्णय घेण्यापासून रोखले आहे. या याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रशासकीय कारभारात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास न्या. सौ. एम्. ए. साळी यांनी मज्जाव केला आहे.
सातारा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी 28 सप्टेंबर रोजी पालिकेत नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जाहीर केला होता या निर्णयाला आठवडा होत नाही तोच पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात असलेल्या मोठ्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह तीन संचालकांचे अधिकार गोठविण्याचा निर्णय दिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीला हा जबर हादरा मानला जात आहे. दरम्यान, या याचिकेचा अंतिम निर्णय काय लागतो याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.