सातारा : एमआयडीसी मधील कंपनीला पुणे येथील एकाने 6 लाख 50 हजाराचा गंडा घातल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी धरमदास अनिलकुमार (रा. पिंपरी पुणे) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद एफ अॅन्ड के अॅग्रो प्रायव्हेट लि; चे मॅनेजर वासुदेव वधनमल सेवानी (वय 67) यांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जुनी एमआयडीसी येथे एफ अॅन्ड के अॅग्रो प्रायव्हेट लि; आहे. या कंपनीत रवा, मैदा व आट्याचे उत्पादन तयार होते. दि. 8 एप्रिल 2016 रोजी संशयित धरमदास अनिलकुमार हा येवून मॅनेजर वासुदेव सेवानी यांना भेटून मी तुमच्या कंपनीचा माल बाहेरील जिल्ह्यात व राज्यात विकून देतो तसेच मडगाव, गोवा येथे माजी गायत्री व धनराज बेहरुमल फर्म असून त्या फर्ममार्फत मी तुमचे काम करतो असे म्हणून विश्वास संपादन केला. दि. 18 एप्रिल रोजी संशयित अनिलकुमार याने सेवानी यांना फोन करुन 2 लाख 28 हजाराची ऑर्डर दिली. तसेच 28 एप्रिल 2016 ला पुन्हा 4 लाख 14 हजाराची ऑर्डर दिली. त्यानंतर संशयिताने 2 लाख 34 हजाराचा चेक सेवानी यांच्याकडे दिला. तो चेक वटवण्यास गेला असता संशयिताचे खातेच बंद असल्याचे निदर्शनास आले.
सेवानी यांनी वेळोवेळी संशयिताशी फोनवर पैशाची मागणी केली असता आजतागायत पैसे दिले नाहीत. दरम्यान कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.