औंध : भोसरे ता.खटाव येथे चोरटयांच्या धुमाकूळामुळे महिला, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे 30 ते 35 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाअसून पोलिसांसमोर या चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास गणेश मधुकर जाधव यांच्या घराची आतील कडी काढून अज्ञात चोरट्यांनी घरात अडकून ठेवलेल्या पँटीतले रोख सात हजार रुपये काढून नेले त्यानंतर त्यांच्या आईच्या गळयातील मंगळसूत्र तोडून काढले व गणेश जाधव यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असता त्या जाग्या झाल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.
त्यानंतर चोरट्यांनी गावातील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीच्या गळयातील सुमारे दिड ते दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माळांवर ही या चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती मिळाली असून भोसरे ते जायगाव मार्गावरील नंदीप नावाच्या शिवारातील ब्रम्हदेव जाधव यांच्या शेतातील विहीरीतील सुमारे 17 हजार रुपये किंमतीची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
दरम्यान या चोरट्यांनी दोन दिवस भोसरे, चौकीचा आंबा परिसरात धुमाकुळ घातला असून यातील चोरीच्या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनला झालेली नाही.