सातारा : सातारा येथील ‘मराठा क्रांती मोर्चा’चे आपण सुद्धा एक साक्षीदार बनावे यासाठी परराज्यातील मराठा बांधवसुद्धा पुढे आले आहेत. त्यांनाही या मोर्चाचे वेध लागले असून सयोंजकानी फक्त आमच्याकडे शब्द टाकावा… आम्ही तयारच आहे. लागेल ती मदत करण्यास आम्ही सज्ज आहे, असा निरोपही त्यांनी दिला आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू येथील मराठा राजघराणी आणि संस्थानिकांनी आम्हीही तुमच्याबरोबर आहे असे सांगितले आहे. या अनुषंगाने त्यांनी कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथील बाबुराव काटकर यांच्या जवळून निरोप धाडला आहे. दरम्यान परराज्यातील मराठा बांधव ही सातारा येथील मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे मराठा बांधवांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सातारा येथील मराठा क्रांती मोर्चा शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी मराठा समुदायातील विविध घटक पुढे आले आहेत. चार दिवसांपूर्वी सातारा येथे झालेल्या बैठकीनंतर तर ही प्रक्रिया आणखी वेगाने सुरु झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी आणि खेडोपाडी तसेच वाडी-वस्तीवरील मराठी बांधव ममी सहभागी होतोय… तुम्ही होणार ना..! अशी साद घालत जनजागृती करत आहे. सातारा येथील ‘मराठा क्रांती मोर्चा’ 3 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता निघणार आहे. त्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील आबालवृद्ध पुढे सरसावले आहेत.
परराज्यातील राजघराणी आणि संस्थानिकांशी बाबुराव काटकर यांचे जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे संबंध आहेत. विशेष म्हणजे बाबुराव काटकर यांनी तामिळनाडू येथील तंजावर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काही वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत त्यांनी येथे मराठा बांधवांसाठी उल्लेखनीय काम केले आहे. तंजावरचे राजे बाबाजीराजे भोसले त्याचबरोबर मूळचे खटाव तालुक्यातील आणि आता मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील प्रतापसिंह देशमुख मराठा क्रांती मोर्चासाठी सहकार्य करणार आहेत.
मूळचे कोरेगाव तालुक्यातील कन्हेरखेड येथील आणि आता मध्यप्रदेशातील ग्व्हालेर येथील खासदार ज्योतीरादित्य शिंदे त्याचबरोबर अमृतराव सुर्वे स्वतःहून बाबुराव काटकर यांच्या संपर्कात आहेत. बडोदाचे माजी खासदार सत्यजित गायकवाड यांनीही सहकार्याची भूमिका दर्शवली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील आणि आता रायचूर येथे असलेले राजेंद्र देशमुख तसेच कर्नाटकातील व्यंकटरावजी घोरपडे यांच्याशी सुद्धा आज अथवा उद्या बाबुराव काटकर संपर्क साधून ‘मराठा क्रांती मोचा’ मागील भूमिका विशद करणार आहेत.
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मराठा…
सातारा जिल्ह्यातील कोणत्याही गावात अथवा काना-कोपर्यात गेले तरी फक्त आणि फक्त ‘मराठा क्रांती मोर्चा’चीच चर्चा सुरु आहे. काही झाले तरी आपण बायका-पोरांसह सहभागी व्हायचे आहे, असे निरोप एकमेकांना दिले जात आहेत. गेल्या आठ दिवसांत जवळपास लाखो ग्रुप तयार झाले आहेत. लाखोंच्या संख्येने फेसबुक पेज तयार झाले आहेत आणि होत आहेत. मराठा समुदायातील अधिकारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, कामगार, शेतकरी, महाविद्यालयीन युवक आणि युवती, महिला, गृहिणी यांनी स्वतःचे व्हाट्स अप ग्रुप तयार केले असून मराठा समाजात जनजागृतीचे काम सुरु आहे.
मी काय मदत करू शकतो..?
कोपर्डी त्याचबरोबर अन्य काही घटनांमुळे महाराष्ट्रातील मराठा बांधव पेटून उठला आहे. लाखोंच्या संख्येने निघणारे मोर्चे हे त्याचेच प्रतीक आहे. मराठा बांधव स्वतः हुन यामध्ये सहभागी होत आहे. विशेष म्हणजे काही लोक तर स्वतःहून पुढे आले असून आम्ही सहभागी तर होणारच आहे पण तुम्हाला आमच्याकडून काय मदत हवी ते सांगा. आम्ही एका पायावर तयार आहे. निधी असो अथवा वाहनांची जबाबदारी असेल तर सांगा, असा निरोप संयोजकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे आम्ही मदत करतोय याची कुठे जाहीर चर्चाही नको आणि आमचे कुठे नावही घेऊ नका, असे सांगून मराठा समाज आपला मनाचा मोठेपणासुद्धा दाखवत आहेत.