सातारा : करंजे परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात एकुण चार लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही घटनांची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी करंजे येथील फ्लॉवर व्हॅली अपार्टमेंटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने 2 लाख 50 हजाराची रोकड चोरून नेली. या घटनेची फिर्याद स्मिता संजय रणपिसे वय 40 रा. मुंबई यांनी दिली आहे. स्मिता रणपिसे या मुंबईतच राहत असून त्या अधुन मधून करंजे येथील घरी येत-जात असत.
या घटनेमुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. तसेच दुसर्या घटनेत त्याच अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या बाजीराव गेन चिकणे वय 57 रा. कुसुंबी ता. जावली यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख 25 हजार व आठ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख 57 हजाराचा ऐवज चोरून नेला. चिकणे यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची फिर्याद शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.