हमराज, रेस चित्रपटात दमदार खलनायकाची भुमिका करणारा अक्षय खन्ना ढिशुम चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ढिशुम चित्रपटातमध्ये तगडी स्टार कास्ट आहे. जॉन, वरुन धवन, जॅकलिन, सकिब सलीम, राहूल देव, राम कपूर आणि कबीर बेदीसारखे तगडे स्टार असताना चित्रपटभर लक्षात राहतो तो फक्त अक्षय खन्ना आणि त्याचा दमदार अभिनय. तब्बल 4 वर्षानंतर रुपरी पडद्यावर त्याने दमदार अभिनय केला आहे असचं म्हणाव लागेल. नो प्रॉब्लेम, आक्रोश, तीस मार खान सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तो रुपेरी पड्यावरुन गायबच झाला होता. पण ढिशुमद्वारे त्याने दमदार पदार्पन केलं आहे.
चित्रपटाचे कथानक- ढिशुमची कथा इतर सर्वसामान्य मसालापटांसारखीच आहे. इंडिया पाकिस्तानमधील महत्त्वाच्या मॅचच्या पुर्वसंध्येला भारताचा टॉप बॅट्समन विराज शर्मा (साकिब सलीम) किडनॅप होतो. त्याला शोधण्याची जबाबदारी कबीर शेरगील (जॉन अब्राहीम) आणि जुनैद अन्सारी (वरूण धवन) यांच्यावर सोपवली जाते. मग सुरु होते 36 तासांची शोधमोहीम. या मोहिमेत विराज शर्माच्या शोधात ते अबु धाबीला पोचतात. मग तिथे त्यांची इशिका (जॅकलिन फर्नाडिस) या ड्रग डीलरशी भेट होते आणि मग पुढे कशाप्रकारे हे सर्वजण विराज शर्माला वाघाच्या तावडीतून (अक्षय खन्ना) सोडवतात याचा जुनाट आणि वर्षानुवर्षे घासून गुळगुळीत झालेल्या फॉर्मुल्यावर आधारित दर्शन म्हणजे ढिशुम. हे कथानक वरकरणी मनोरंजक वाटत असले तरी सिनेमा बघताना त्यात काही नाविन्य जाणवत नाही.
कलाकारांचा अभिनय – सुमारे चार वर्षांनंतर अक्षय खान्ना या सिनेमात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात त्याने अगदी सहजतेने व्हिलन साकारला आहे. त्याच्या अभिनयात एक प्रकारचे गांभीर्य जाणवते. त्यामुळे जॉन इब्राहिम आणि वरून धवनपेक्षाही अक्षय हा चित्रपट उचलून धरतो. वरुन धवन कॉमेडी करण्यात यशस्वी झाला आहे पण मोजक्या प्रसंगापुरताच तो हसवण्यात यशस्वी झाला आहे. पुर्ण चित्रपटभर जॉन आपल्याला अॅटीट्यूड आणि बॉडी दाखवताना दिसेल. अक्षय कुमार आणि नरगीस फाकरी यांनी चित्रपटात पाहुण्या कलाकरांची भुमिका केली आहे. तेव्हा पैसे खर्च करून ढिशुम पहायचाच असेल तर अक्षयसाठीच पहा.
चित्रपटाचे संगीत – तसं पाहिलं तर चित्रपटात 3 गाणी आहेत एक सुरवातीला एक मध्यंतरी आणि एक शेवटी. चित्रपटाचं टाइटल साँग नसतं तरी अधिक उत्तम झालं असतं. सौ तरहा के आणि जानेमन गाणी ऐकण्यास बरी वाटतात पण गाणी चित्रपटाच्या कथानकाला सोडून आहे. गाण्यामुळे चित्रपट अधिक कंटाळवाणा वाटायला लागतो.